भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम १२ वर्षांपासून रेंगाळलेल्या अवस्थेतच आहे. मात्र काम पूर्ण होण्याअगोदर राजरोसपणे टोलवाढ करून त्याची वसुलीही सुरू आहे. भोर, वेल्हे तालुक्यातील वाहनधारकांची टोलवसुली होत असून मानसिक त्रास दिला जात आहे. त्यामुळे स्थानिक लोकांच्या भावना तीव्र असून त्याचा उद्रेक होऊ शकतो. भोर, वेल्हे तालुके टोलमधून वगळावे किंवा टोल फ्री पास द्यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. पुणे-सातारा महामार्गाच्या देहूरोड ते सातारा या १४० किलोमीटरच्या चौपदरीकरणासाठी १९९९ मध्ये ६० मीटरचे भूसंपादन करण्यात आले. पाच वर्षांनंतर २००४ मध्ये चौपदरीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. ते पूर्ण झाल्यावर २०१० मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्रा कंपनीला या कामाचा १७२४ कोटी रुपयांचा ठेका दिला. त्याबदल्यात शिवापूर व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रस्त्याचे काम मार्च २०१३ पर्यंत पूर्ण करण्याची अट घातली होती. मात्र ते अजून पूर्ण झालेले नाही. तरीही ४० टक्के टोलवाढ करून वसुलीही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
रुंदीकरण रेंगाळलेलेच; सातारा मार्गावर टोलवाढ
By admin | Published: April 17, 2017 2:38 AM