राकेश घानोडे / नागपूरपतीप्रमाणे पत्नीलाही स्वेच्छेने नोकरी व व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. पती स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पत्नीला तिच्या मनाविरुद्ध नोकरी सोडण्यास लावू शकत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे.उच्च शिक्षित पत्नी अकोला येथे नोकरी करीत असून पतीने नोकरी सोडून नागपूर येथे व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे पत्नीने नोक री सोडावी किंवा नागपूर येथे बदली करून सोबत रहायला यावे, असे पतीचे म्हणणे होते. पत्नी नागपूर येथे बदली करून घेण्यास तयार आहे, पण सध्या पीएच.डी. सुरू असल्यामुळे पतीने काही काळ थांबले पाहिजे, अशी तिची बाजू आहे. न्यायालयाने निर्णयामध्ये याप्रकरणातील पतीसारख्या अन्य पुरुषांचे कान टोचले आहे. हा स्त्री-पुरुष समानता व महिला सशक्तीकरणाचा काळ आहे. असे असले तरी याप्रकरणातील पतीसारखे पुरुष स्वत:चे वर्चस्व दाखविण्यासाठी पत्नीने उच्च शिक्षण व नोकरी सोडण्याची अपेक्षा करतात. अशा प्रकरणात तडजोड करता येऊ शकते, पण प्रत्येकवेळी पत्नीनेच त्याग करण्याची भूमिका ठेवणे चुकीचे आहे, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे.प्रकरणातील पती-पत्नी लग्नापूर्वी मुंबई येथे नोकरीला होते. नंतर पतीची वर्धा जिल्ह्यात बदली झाली. त्यामुळे पत्नी मुंबईतील नोकरी सोडून पतीसोबत वर्धा जिल्ह्यात राहू लागली. दरम्यानच्या काळात तिने अकोला येथे नोकरी मिळविली. त्याचवेळी पतीची अकोल्याजवळच्या शहरात बदली झाली. परंतु, नोकरी मनासारखी नसल्याचे कारण सांगून त्याने नोकरी सोडून नागपुरात व्यवसाय सुरू केला.न्यायालयाने या मुद्यावर विचार व्यक्त करताना पतीला समज दिली. पत्नीने पतीसाठी एकदा नोकरी सोडली. त्यामुळे पती तिला वारंवार नोकरी सोडण्यास सांगू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
पत्नीलाही नोकरी करण्याचा अधिकार
By admin | Published: March 20, 2017 3:36 AM