ऑनलाइन लोकमत
मोहोळ, दि. २२ - घराच्या दिशेने येताना दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहीरीत पडल्याने पत्नीचा बुडून मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री सात वाजणाच्या सुमारास खुणेश्वर (ता. मोहोळ ) येथे घडली.
सिमा वैभव मगर (वय २७)असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव कालिदास मगर (वय ३५) व त्यांच्या पत्नी सिमा हे दोघे आपल्या दुचाकी वरून सिमा यांच्या माहेरी नरखेड येथे गेले होते.
त्याठिकाणाहून परत खुणेश्वरकडे येताना तात्या डोंगरे यांच्या शेतातील रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये वैभव यांची दुचाकी पडली. त्यामुळे वैभव यांच्या पत्नी सिमा या पाण्यात पडल्या व त्यांचा बुडून जागीच मृत्यू झाला.
तर वैभव यांनाही जबर मार लागला व ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची खबर चंद्रकांत मोटे यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सपोनि राजू राठोड हे करीत आहेत.