मुंबई : पत्नी लवकर उठत नाही व ती स्वादिष्ट स्वयंपाकही करत नाही. ती कर्तव्यदक्ष पत्नी नसल्याने, तिच्यापासून घटस्फोट मिळावा, यासाठी एका व्यक्तीने उच्च न्यायालयात अपील केला. मात्र, हे घटस्फोटासाठीचे कारण असू शकत नाही, असे म्हणत, उच्च न्यायालयाने त्याचे अपील गुरुवारी फेटाळले.ही वागणूक म्हणजे क्रूरता नाही, असे स्पष्ट करत, न्या. के. के. तातेड आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने सांताक्रुझ येथे राहणाºया व्यक्तीने, वांद्रे कुटुंब न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध केलेले अपील निकाली काढले. अर्जदाराने याचिकेद्वारे केलेले आरोप म्हणजे क्रूरता नाही, असा कुुटुंब न्यायालयाने काढलेल्या निष्कर्ष योग्य आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.याचिकाकर्त्याची पत्नी नोकरदार महिला आहे, तरीही ती अतिरिक्त भार सहन करत आहे. किराणा माल भरणे, पती व त्याच्या पालकांसाठी स्वयंपाक करणे आणि अन्य घरगुती कामे ती करत होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. पत्नी स्वादिष्ट स्वयंपाक करत नाही किंवा सकाळी लवकर उठत नाही, हे पतीने केलेले आरोप घटस्फोटाचे कारण म्हणून स्वीकारले जाऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. कुटुंब न्यायालयानेही याच कारणाने घटस्फोट अर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने, याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. कुटुंब न्यायालयाने चुकीचा निर्णय दिल्याचे याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले आहे.पत्नीला लवकर उठवायला गेल्यावर, ती मला व माझ्या पालकांना शिवीगाळ करते. ती पुरेसा व स्वादिष्ट स्वयंपाक करत नाही. एके दिवशी मी कामावरून घरी उशिरा परतल्यावर तिने साधे पाणीही मला दिले नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे केला आहे. मात्र, पत्नीने सर्व आरोप फेटाळले. कामाला जाण्यापूर्वी मी सर्व कुटुंबीयांसाठी स्वयंपाक करून जात होते, असे पत्नीने न्यायालयाला सांगितले. आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तिने शेजाºयांचे व काही नातेवाइकांचे लेखी जबाबही न्यायालयात सादर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते याचिकाकर्त्याच्या घरी जायचे, तेव्हा याचिकाकर्त्याची पत्नी घरगुती कामात व्यस्त असायची.पती व त्याचे आई-वडीलच आपल्याला वाईट वागणूक देत असल्याचा आरोप पत्नीने केला. त्यावर न्यायालयाने पत्नी तिच्या पतीला व त्याच्या पालकांना सतत शिवीगाळ करत असे, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे म्हटले. ‘प्रतिवादी (पत्नी) सतत याचिकाकर्त्याला आणि त्याच्या पालकांना शिवीगाळ आणि धमकी देत होती, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. याचिकाकर्ता घरी उशिरा येत आणि त्याची पत्नी स्वादिष्ट स्वयंपाक बनवत नसे व त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष करत होती, ही क्रूरता नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.>उच्च न्यायालयाने अपील फेटाळले‘प्रतिवादी एक नोकरदार महिला आहे, हे विसरता येणार नाही. ती काम करून अतिरिक्त भार सहन करत आहे. कामावरून घरी परताना ती भाजी व किराणामाल विकत घेते. तर सकाळी घर सोडण्यापूर्वी संपूर्ण कुटुंबासाठी स्वयंपाक करून निघते. त्यामुळे दररोज घरी परतल्यावर पत्नीने एक ग्लास पाणी देण्याच्या पतीच्या अपेक्षेबाबत कुटुंब न्यायालयाने केलेली टीका योग्य आहे,’ असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्याचा अपील फेटाळले.
‘पत्नी चविष्ट स्वयंपाक करत नाही, हे घटस्फोटाचे कारण असू शकत नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 5:49 AM