नागपूर : पतीला न सांगता, न विचारता पत्नीचे वारंवार माहेरी जाणे आणि तेथे महिनोंमहिने राहणे, पतीसोबत सतत या ना त्या कारणावरून भांडण करणे व पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवणे या गोष्टी घटस्फोटाचे कारण ठरल्या आहेत. ही कृती पतीला मनस्ताप देणारी आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून या कारणावरून पतीला मिळालेला घटस्फोट योग्य ठरवला आहे.न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला आहे. नागपुरातील लुर्दमेरी व जॉनी (बदललेली नावे) यांचे २४ ऑक्टोबर २००७ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर लुर्दमेरी संयुक्त कुटुंबात काही महिने राहिली, पण पुढे ती पतीला न सांगता वारंवार माहेरी जायला लागली. तिची संयुक्त कुटुंबात राहण्याची इच्छा नव्हती. जॉनी तिला प्रत्येकवेळी सासरी परत आणत होता. दरम्यान, तिने पोलीस ठाण्यात छळाची तक्रार नोंदवली. महिला सेलच्या मध्यस्थीमुळे तो वाद मिटला. मुलाचा जन्म झाल्यानंतर लुर्दमेरी सासरी येण्यास तयार नव्हती. जॉनीने कायदेशीर नोटीस बजावल्यामुळे ती परत आली. तिची संयुक्त कुटुंबात राहण्याची इच्छा नसल्यामुळे जॉनीने भाड्याचे घर घेतले होते. परंतु, तेथेही लुर्दमेरी समाधानाने राहिली नाही. ती सतत भांडण करून जॉनीला मानसिक व शारीरिक त्रास देत होती. परिणामी, जॉनीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. २ मे २०१७ रोजी ती याचिका मंजूर झाली. त्या निर्णयाविरुद्ध लुर्दमेरीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
पत्नीचं वारंवार माहेरी जाणं ठरलं घटस्फोटाचं कारण; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 4:51 AM