कोल्हापूर : नवऱ्याच्या नसबंदीला बायकोकडूनच विरोध होत असल्याचे कोल्हापूर या प्रगतशील जिल्ह्यातील वास्तव आहे. स्त्रिया स्वत:ची शस्त्रक्रिया करून घेतात; पण नवऱ्याला करू देत नाहीत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत केवळ ११ टक्के पुरुष शस्त्रक्रिया झाल्या आहेत. याऊलट नंदूरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात हेच प्रमाण ७० टक्के आहे. नवऱ्याची शक्ती कमी होण्याचे स्त्रियांच्या मनात वर्षानुवर्षे साचलले गैरसमजाचे मळभ दूर केले, तरच नसबंदीला मान्यता मिळणार आहे.
नसबंदी फक्त स्त्रियांनीच करावी, असा अलिखित नियम झाल्यासारखी स्थिती आहे, असे एका बाजूला आकडेवारीवरून दिसत असले तरी, यामागचे वास्तव मात्र वेगळेच आहे. कुटुंबनियोजनअंतर्गत नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली, तर बायको पटकन पुढे येते. नवऱ्याने इच्छा व्यक्त केली तरीदेखील बायको तयार होत नाही. त्यामुळे २०१८ पासून मार्च २०२० पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर ७८. ६२ टक्के शस्त्रक्रिया या स्त्रियांच्या झाल्या आहेत, तर केवळ ९ टक्केच पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली आहे.
गेल्यावर्षी मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यात कुटुंब नियोजनाच्या एकूण १४ हजार ७८ शस्त्रक्रिया झाल्या. त्यापैकी पुरुषांच्या १५२, तर स्त्रियांच्या१३ हजार ९२६ शस्त्रक्रिया झाल्या. यात पुरुष नसबंदीसाठी १६०८ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होतेे, त्यापैकी केवळ १५२ शस्त्रक्रियाच होऊ शकल्या.
२०१८ मध्ये झालेल्या शस्त्रक्रिया -
स्त्री - १३ हजार ३४७ (७५.३१ टक्के)
पुरुष -१७४ (१० टक्के)
२०१९ मध्ये झालेल्या शस्त्रक्रिया
-स्त्री -१३ हजार ९२६ (७८.६२ टक्के)
पुरुष - १५२ (९ टक्के )
काय आहेत गैरसमज
नसबंदीविषयी स्त्री आणि पुरुष अशा दोघांमध्ये गैरसमजच जास्त असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार प्रबाेधन करूनही सुशिक्षित लोकदेखील अशिक्षितांसारखेच बोलत असल्याचे अनुभव आरोग्य विभागाला येतात. नसबंदी केली की पुरुषार्थावर परिणाम होईल, त्यांची शक्ती जाईल, त्यांना आयुष्यभराचे अधूपण येईल, अंगमेहनतीची कामे करता येणार नाहीत, असे अनेक गैरसमज मनावर खोलवर रुजले आहेत.
गेल्यावर्षी केवळ दोन टक्के नसबंदी
कोल्हापुरात २०१८ आणि २०१९ अशा मागील दोन वर्षांत १४ हजार ७८ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पण गेल्यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या शस्त्रक्रियांवर मोठा परिणाम झाला. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत स्त्रियांचे उद्दिष्ट १७ हजार ७१३ पैकी केवळ ६ हजार ९३१, तर पुरुषांच्या १६०८ उद्दिष्टापैकी केवळ ३३ शस्त्रक्रियाच होऊ शकल्या आहेत. वर्षभरात स्त्रियाची ३९, तर पुरुषांची केवळ २ टक्केच नसबंदी शस्त्रक्रिया झाली.
गैरसमज जास्त असल्यानेच पुरुषांचा नसबंदीचा टक्का स्त्रियांच्या आणि इतर जिल्ह्याच्या तुलनेत फारच कमी आहे. आरोग्य विभाग सातत्याने जनजागृती करत आहे, पण यावर मानसिकतेत बदल हाच एकमेव उपाय आहे. - डॉ. एफ. ए. देसाई, माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर