ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 8- दशरथ मांजी यांच्या चित्रपटातील भीमपराक्रमासारखं काम वाशीम जिल्ह्यातील बापूराव ताजणे यांनी केलं. सवर्ण जातीच्या शेजा-यांनी पत्नीला त्यांच्या विहिरीचं पाणी देण्यास नकार दिल्यानं बापूराव ताजणेंनी चक्क विहीर खोदली आहे. जवळपास 40 दिवसांहून अधिक काळ ते विहीर खोदत होते.
ताजणे त्यांच्या कुटुंबीयांसह वाशीम जिल्ह्यातील कलांबेश्वर गावात राहतात. त्यांनी खोदलेल्या विहिरीचा गावातील सगळ्याच दलितांना उपयोग होतो आहे. बापूराव ताजणे हे दररोज 8 तासांच्या मजुरीचं काम करतात. मात्र उर्वरित राहिलेल्या तासांपैकी जवळपास 6 तास ते विहीर खोदण्यासाठी देत होते. या प्रकारामुळे शेजारी त्यांची नेहमीच टिग्गल करून त्यांना वेड्यात काढत होते. आजूबाजूच्या तीन विहिरी आणि एक बोअरवेल भीषण दुष्काळामुळे पूर्णतः कोरड्या पडल्या होत्या. त्यातच त्यांच्या या विहीर खोदण्याच्या अट्टहासामुळे लोक त्यांची चेष्टा करत होते. विहीर खोदण्यास चार- पाच जणांची गरज असताना बापूराव ताजणेंनी स्वकष्टानं एकट्यानं ही विहीर खोदली. त्यांना पाणी देण्यास नकार दिलेल्या व्यक्तीचं ताजणेंनी नावंही सांगितलं नाही. गावात मला खून-खराबा आणि हाणामारी नको आहे. मात्र आम्ही गरीब असल्यानंच आम्हाला पाणी नाकारण्यात आलं. त्यादिवशी मला खूप दुःख झालं, असं बापूराव ताजणेंनी सांगितलं.
पत्नीला पाणी न दिल्यामुळे आता कोणाकडे काहीच मागायचं नाही, असं मी ठरवल्याचं बापूराव ताजणेंनी म्हटलं आहे. मालेगावात जाऊन मी विहीर खोदण्याची अवजारे घेऊन आलो आणि खोदकाम सुरू केलं. देवाच्या कृपेमुळेच माझ्या विहिरीला आज पाणी लागलं आहे, असं बापूराव ताजणे म्हणाले.