बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, ती माझी चूक; अजित पवारांची जाहीर कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:05 PM2024-08-13T12:05:37+5:302024-08-13T12:15:08+5:30

राजकारण हे घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Wife Sunetra should not have nominated in baramati against sister supriya sule it was my mistake Ajit Pawar confession | बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, ती माझी चूक; अजित पवारांची जाहीर कबुली

बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, ती माझी चूक; अजित पवारांची जाहीर कबुली

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : "बारामती लोकसभा मतदारसंघात बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती," अशी जाहीर कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत बारामतीत पवार कुटुंबात मोठा राजकीय संघर्ष रंगला होता. अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना राजकीय आव्हान देत सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र सुनेत्रा पवार यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता निवडणूक निकालाच्या दोन महिन्यांनी अजित पवारांनी उमेदवारीबाबत आपल्याकडून चूक झाल्याचं सांगितलं आहे.

"बारामतीत कोणी लाडकी बहीण आहे का तुमची?" असा प्रश्न जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, "सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, मात्र सर्वच बहिणी माझ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. पण राजकारण हे घरामध्ये शिरून द्यायचं नसतं. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. तेव्हा पार्लामेंट्री बोर्डाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला गेला. आता एकदा बाण सुटल्यावर माघारी घेता येत नाही. परंतु आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं," असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.

राखीपौर्णिमेला तुम्ही सुप्रिया सुळेंकडे जाणार आहात का? असाही प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर "माझा सध्या राज्यभरात दौरा सुरू आहे. मात्र राखीपौर्णिमेच्या काळात मी जर बारामतीत असेल आणि माझ्या बहिणीही तिथं असतील तर मी नक्कीच जाईल," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात नक्की काय घडलं?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाची चांगलीच चर्चा झाली. या मतदारसंघात तीन टर्मपासून खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. बारामती आणि आसपासच्या तालुक्यांवर वर्चस्व असणाऱ्या अजित पवार यांच्या या निर्णयामुळे बारामतीत राजकीय उलथापालथ होणार का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र बारामतीचा बालेकिल्ला राखण्यात सुप्रिया सुळे यांना यश मिळालं असून त्यांचा तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी विजय झाला.

बारामतीवर थोरले की धाकटे पवार वर्चस्व राखणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान आहे. वेळोवेळी मिळालेल्या राजकीय यशाने हे स्थान नेहमीच अधोरेखित झाले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासह ‘साहेब’ आणि ‘दादां’च्या राजकारणाचेच एका अर्थाने आज भवितव्य ठरणार होते. भावनिकतेचा मुद्दा आणि विकासकामांच्या मुद्यासह पवार कुटुंबीयांनी एकमेकांवर केलेले आरोप यंदाच्या लोकसभेत चर्चेचा विषय ठरले. या निवडणुकीत बाजी मारत शरद पवार यांनी बारामतीकरांच्या मनावर आपणच राज्य करत असल्याचं सिद्ध केलं.

Web Title: Wife Sunetra should not have nominated in baramati against sister supriya sule it was my mistake Ajit Pawar confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.