मुंबई : मालाड एसआरए भूखंड गैरवाटपाबाबत ‘पानीपतकार’ म्हणून ओळखले जाणारे लेखक व तत्कालीन जिल्हाधिकारी विश्वास पाटील व त्यांच्या पत्नी चंद्रसेना यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश २४ जुलै रोजी विशेष एसीबी न्यायालयाने एसीबीला दिले. विशेष न्यायालयाच्या या आदेशाला पाटील दाम्पत्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहत असताना, विश्वास पाटील यांनी मालाड येथील एसआरए खासगी विकासकाचा फायदा होईल, अशा पद्धतीने सरकारी जमीन वापरण्याचा अधिकार विकासकांना दिला. त्याबदल्यात एका विकासकाने पाटील यांच्या पत्नी चंद्रसेना यांना त्यांच्या कंपनीच्या संचालकपदी नियुक्त केले, असा आरोप या प्रकल्पातील एका लाभार्थी गाळेधारकाने केला आहे. त्यानुसार विशेष एसीबी न्यायालयाने पाटील व त्यांच्या पत्नीवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश एसीबीला दिला. या आदेशाला पाटील दाम्पत्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. रणजीत मोरे व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी होती. मात्र, खंडपीठाने या याचिकांवर आपण सुनावणी घेऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे पाटील यांना अन्य खंडपीठापुढे याचिका सादर करावी लागली.चंद्रसेना पाटील यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. तर विश्वास पाटील यांनी भूखंडाचे वाटप आपण केले नसून, ते काम एसआरएचे असल्याचे याचिकेत म्हटले आहे. ‘भूखंडाचे वाटप एसआरएने केले असून, विकासकाला त्यांनीच ‘लेटर आॅफ इंटेट’ दिले. मी केवळ औपचारिकता पार पाडली. जिल्हाधिकारी म्हणून भूंडवाटपात माझी काहीही भूमिका नव्हती. मात्र, या बाबीचा विशेष न्यायालयाने विचार केला नाही,’ असे म्हणत, विश्वास पाटील यांनी विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.
विश्वास पाटील यांची पत्नीसह हायकोर्टात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 4:17 AM