ठाणे : लग्नात मिळालेले १७० ग्रॅम वजनाचे पत्नीचे सोन्याचे दागिने एका खासगी बँकेत गहाण ठेवून त्यापोटी एक लाखाची रक्कम बँकेत हप्ता भरण्याच्या नावाखाली पतीने घेतली. मात्र, बँकेत हप्ताही भरला नाही. याप्रकरणी इस्माईल अबुबकर आणि त्याचा मित्र हाफीज कागडी या दोघांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्माईलने त्याची पत्नी सिरीनआराचा विश्वास संपादन करून तिचे तीन हार, बाजूबंद, सोनसाखळी, अंगठी, चार बांगड्या असे १७० ग्रॅम वजनाचे दागिने २०११ ते २० एप्रिल २०१५ या कालावधीत एका पेढीत गहाण ठेवले होते. त्याच कर्जाच्या हप्त्याची एक लाखाची रक्कमही तिच्याकडून घेतली. यातील एकही हप्ता त्याने पेढीत भरला नाही. तसेच तिच्या आईचे २९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक लाखाची रोकड असा सहा लाख ८० हजारांचा ऐवज हाफीज कागडी या मित्राशी संगनमत करून पलायन केले. याप्रकरणी २५ एप्रिल रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक चंदनकर अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
पत्नीची सहा लाख ८० हजारांची फसवणूक
By admin | Published: April 27, 2015 3:51 AM