- लोकमत न्यूज नेटवर्क
मुरुड (जि.लातूर) : मेहुण्याच्या लग्नात सासऱ्याने अंगठी न दिल्याने रुसलेल्या जावयाने दोन मुलांसमोरच पत्नीला हौदावर आपटून, बेदम मारहाण केली आणि विहिरीत फेकून तिची हत्या केली. त्यानंतर गावात येऊन पत्नी विहिरीत पडल्याची आवई उठविली. मात्र बनाव उघडकीस येत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने गुरुवारी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.प्रगती दत्ता भिसे (२७, रा. मुरुड, जि. लातूर) असे मृत विवाहितेचे नाव असून तिच्या भावाचा विवाह मंगळवारी ढोकी (ता. उस्मानाबाद) येथे पार पडला. या समारंभासाठी दत्ता भिसे, पत्नी, मुलगा चैतन्य आणि मुलगी भावना दोन दिवस आधी ढोकी येथे गेले होते. ‘मला सोन्याची अंगठी दिली, तर मी लग्नासाठी थांबतो’ असे दत्ता याने सासऱ्यांना सांगितले. त्याला सासऱ्यांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे रागावलेला दत्ता मुरुडला परतला. मंगळवारी त्याच्या मेहुण्याचे लग्न झाले. बुधवारी दुपारी पुन्हा सासरी जाऊन तो पत्नी व मुलांना दुचाकीवरून घरी नेत होता. वाटेत गावाजवळच्या एका विहिरीजवळ तो थांबला. तिथे पत्नीसोबत वाद घालून त्याने तिला उचलून पाण्याच्या हौदावर आपटले. यात गंभीर जखमी होऊन प्रगती आरडाओरड करू लागली. त्याकडे दुर्लक्ष करीत त्याने पुन्हा काठीने मारून तिला विहिरीत फेकून दिले आणि मुलांना घेऊन गावात आला. गावात पोहोचताच पत्नी विहिरीत पडल्याचा कांगावा सुरू केला. मात्र मुलांनी पाहिलेली घटना रात्री आजी, आजोबांना सांगितली. त्यामुळे कुटुंबातील सर्व जण फरार झाले. आपला बनाव उघडकीस येण्याच्या भीतीने आरोपी दत्ता याने स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले.