मुंबई : मुंबईला वायफाय शहर बनविण्यात येणार असून १ मे २०१७ पर्यंत संपूर्ण मुंबईत १२०० वायफाय हॉटस्पॉट उभारण्यात येतील. त्यातील ५०० हॉटस्पॉट हे १ नोव्हेंबर २०१६ पर्यंत कार्यरत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. १५, २० आणि २५ लाखांत सर्वसामान्यांना परवडणारी घरे मुंबईत दिली जातील, असेही ते म्हणाले. विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई शहरात २० एमबीपीएस इतक्या स्पीडने यामाध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. गेट वे आॅफ इंडिया,चौपाटी आदी प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी प्रथम ते सुरू करण्यात येतील. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचे काम येत्या आॅक्टोबरमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. मुंबईत जागांच्या किंमती प्रचंड असल्याने घरांच्या किंमतीही जास्त आहेत.त्यामुळे सरकार तसेच महापालिकेच्या अखत्यारितील जागांवर परवडणारी घरे बांधता येतील.ना विकास क्षेत्रातील २ हजार १०० हेक्टर क्षेत्राचा त्यासाठी वापर करण्यात येईल.मिठागरांचीही ४०० हेक्टर जागा त्यासाठी वापरण्यात येईल.यामुळे १५,२० आणि २५ लाख रूपयांत सर्वसामान्यांना घरे उपलब्ध होतील.मुंबईतील नाविकास क्षेत्रातील ज्या जमिनींचा विकास होऊ शकतो त्यावर परवडणारी घरे उभारण्यात येतील. मुंबई उपनगरातही न्यायालयाच्या परवानगीनंतर क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करण्यात येईल. विविध आरक्षणे तसेच संरिक्षत भागाचा समावेश असलेला मुंबईच्या ६३ टक्के भूभागावर विकासच करता येत नाही.उरलेल्या ३७ टक्के भागातच मुंबई शहराला वसवायचे आहे.परवडणा-या घरांसाठी जागा उपलब्धीसाठी प्रयत्न करण्यात येत असलयाचेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>२०० रस्त्यांची दुसऱ्या टप्प्यात चौकशीमुंबईतील रस्ते बांधकामाच्या चौकशीत कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. चौकशीच्या पहिल्या टप्प्यातील चौकशीत ६ कंत्राटदार व दोन त्रयस्थ लेखापरीक्षकांना काळया यादीत टाकण्यात आले आहे.काही अधिका-यांना अटकही झाली आहे.चौकशीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून यात २०० रस्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. निविदा काढताना जर विशिष्ट कंत्राटदाराला फायदा होईल असे निकष ठरविण्यात आले असतील तर त्याचीही चौकशी होईल व खुली निविदा निघेल याची काळजी घेण्यात येईल. असे मुख्यमंत्री म्हणाले. >विखे पाटील यांची फटकेबाजीविरोधी पक्षांच्या चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. मेरे पास मंत्रियों के भ्रष्टाचार के सबूत है, सच्चाई है, आप के पास क्या है, असा ‘दीवार’ स्टाईल प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावर शिवसेनेने ‘तो मी नव्हेच’ नाटकातील लखोबा लोखंडे प्रमाणे झटक्यात यू-टर्न घेतला. त्यामुळे उत्तम अभिनयाचा ‘आॅस्कर’ शिवसेनेलाच दिला पाहिजे, असे ते म्हणाले. शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावर त्यांनी नव्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले.
मे २०१७ पर्यंत मुंबईत वायफाय
By admin | Published: August 06, 2016 3:25 AM