कल्याण: समाजात काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी सकाळचे वर्तमान पत्र उघडले की त्यात बलात्कार, चोऱ्या, खून अशा बातम्या वाचायला मिळतात. अगदी गाडी ओव्हरटेक केली म्हणून राग येऊन हाणामारी होते. अशावेळी माणसाला पशूची उपमा दिली जाते. मात्र, माणसांच्या कृत्यांना पशूची उपमाही देता येणार नाही, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर मनुष्यपेक्षा वन्यप्राणी चांगले आहेत, असेही त्यांनी म्हटले. आदिवासी भागात काम करीत असताना अनाथ असलेले सिंह, वाघ, आसवल, तरस यासारखे प्राणी आम्ही पाळले आहेत. अगदी विषारी साप सुद्धा माझ्याकडे आहे. त्यांनी कधीही मला इजा पोहचविली नाही. माणसाने त्यांच्या जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांनी अन्नाच्या शोधात नागरी वस्तीत प्रवेश केला असेल, ही बाबही आमटे यांनी नमूद केली. माणसाने सुसंस्कृत असायले हवे. माणूस सिव्हीलाईज झाला असे म्हणण्याऐवजी पशू सिव्हीलाईज चांगल्या प्रकारे झाला आहे, असे म्हणायची वेळ आली हे त्यांनी आवर्जून नमूद केले.
आमटे यांच्या सहचरिणी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी आमटे यांनी सांगितले की, आज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर बलात्कार केले जात आहे. मुलीची भ्रूणहत्या होत आहे. हे प्रकार आदिवासी समाजात घडत नाही. ते सुसंस्कृत नागरी जीवनापेक्षा जास्त सुसंस्कृत आहेत. आदिवासी समाजाकडे शिक्षण नाही. त्यांची जीवनशैली ठरलेली आहे. त्यांच्या समाजाने ती मान्य केलेली आहे. स्त्री-भ्रूण आणि बलात्काराच्या घटनेपासून ते दूर आहेत. त्यांच्या समाजात ते घडत नाही. त्याचा त्यांना अभिमान असल्याचे मंदाकिनी आपटे यांनी सांगितले.