मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेल्या मुदतीचा आजचा अखेरचा दिवस आहे. यामुळे जालना येथे जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही सरकारला दिलेली मुदत संपत असून आज सायंकाळपर्यंत वाट पाहणार असल्याचे म्हटले आहे. शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई यांना वेळ दिलेली आहे, नंतर पुढचा दौरा ठरविला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले.
आज दिवसभर आम्ही सरकारच्या भूमिकेवर व सरकार मराठा आरक्षण देणार का याची वाट पाहणार आहे. पुढील रूपरेषा लवकरच राज्यातील मराठा समाज बांधवांशी चर्चा करून मी ठरवणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून माझा दौरा पुन्हा सुरू होणार आहे. आम्ही सगे सोयरेची अंमलबजावणी करणारच आहोत. शिंदे समितीने काम सुरू ठेवावे व कुणबी प्रमाणपत्र देणे सुद्धा चालू करावे, अशी मागणी जरांगे यांनी केला आहे.
काही अधिकारी जाणून-बुजून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत. हे सुद्धा चुकीचे आहे. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आंदोलनादरम्यान अंतरवाली सराटी येथे ज्या काही मराठा समाज बांधवांवर केसेस दाखल झाल्या आहेत त्या सुद्धा सरकारने मागे घ्याव्यात, अन्यथा सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये मी 288 उमेदवार पाडेन. आताच सरकारने आरक्षण द्यावे. भ्रमात राहू नये. राज्यातील कोट्यवधी मराठ्यांना न्याय द्यावा, असा इशारा जरांगे यांनी शिंदे सरकारला दिला आहे.