मुंबई : मुंबईत दाखल झालेल्या एसी (वातानुकूलित) लोकलचा प्रवास आणखी लांबण्याची शक्यता आहे. या लोकलच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक समस्या अद्यापही सुटलेली नसून त्यामुळे चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) बनलेली ५४ कोटी रुपयांची एसी लोकल काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेकडे दाखल झाली. या लोकलची १६ मेपासून ट्रान्स हार्बर मार्गावर चाचणी घेतल्यानंतर ती त्वरित प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र चाचणी १६ मेपर्यंत न झाल्याने ती प्रवाशांच्याा सेवेतही दाखल होऊ शकली नाही. सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक समस्या असून, ती सोडविण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्या वेळी मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते. तोपर्यंत या लोकलच्या अन्य काही चाचण्या घेण्यावर मध्य रेल्वेकडून भर देण्यात आला; आणि चार सॉफ्टवेअर चाचण्या वगळता अन्य १२ चाचण्या कुर्ला कारशेडमध्ये घेण्यात आल्या. त्या चाचण्यांमध्ये ही लोकल पास झाली. मात्र जुलै सुरू झाला तरी सॉफ्टवेअरमधील तांत्रिक समस्या काही सुटलेली नाही आणि त्याविषयीच्या चाचण्या घेणे बाकी आहे. या लोकलचे दरवाजे उघड-बंद होण्यासंदर्भातील सॉफ्टवेअरचा प्रश्न सुटलेला नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी काही परदेशी तंत्रज्ञ आणि मध्य रेल्वेचे तंत्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. जुलै महिन्यात होणाऱ्या चाचण्यांवरही प्रश्न निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ही लोकल आॅक्टोबरपर्यंत दाखल करण्याचा विचार मध्य रेल्वेकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)>मध्य रेल्वेच्या नियोजनानुसार, पहिल्या १६ चाचण्या घेतल्यानंतर १ ते १५ जुलैपर्यंत पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या १६ चाचण्या आरडीएसओकडून (रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन) करण्याचे नियोजन करण्यात आले होते. कारशेडमधून बाहेर पडल्यानंतर २१ मुख्य चाचण्या या ठाणे ते कर्जत पट्ट्यात किंवा ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्याचा विचार आहे. परंतु त्याचे वेळापत्रकच बिघडले आहे.
एसी लोकल आणखी लांबणार ?
By admin | Published: July 04, 2016 5:07 AM