अजित दादा अस्तित्वाची परीक्षा पास होणार? पवार विरुद्ध पवार सामना बघायला मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:55 AM2024-10-17T11:55:33+5:302024-10-17T11:56:00+5:30
महाराष्ट्राच्या सर्वाधिक पॉवरफुल अशा पवार घराण्यातील काका-पुतणे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. काका हे गुरु आणि पुतण्या हा चेला. लोकसभेत गुरूने चेल्याला सहज मात दिली.
अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री आहेत. काकांच्या सावलीतून ते बाहेर पडले, महायुतीत गेले आणि पुन्हा उपमुख्यमंत्रीच झाले. यावेळची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी तर आहेच; पण पवार विरुद्ध पवार असा रंजक सामना बघायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या सर्वाधिक पॉवरफुल अशा पवार घराण्यातील काका-पुतणे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. काका हे गुरु आणि पुतण्या हा चेला. लोकसभेत गुरूने चेल्याला सहज मात दिली.
महायुतीत अजित पवारांना मिळाल्या केवळ चार जागा आणि जिंकले फक्त एक. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतील प्रतिष्ठेच्या लढाईत नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून मोठ्या मतफरकाने पराभूत झाल्या. आता विधानसभेच्या निमित्ताने काका पुतण्याची पुन्हा परीक्षा घेत आहेत. पूर्वी बरेचसे फटकळ असलेल्या अजित पवार यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये स्वत:त बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या गुलाबी जॅकेटची तर सगळीकडे चर्चा आहे. पूर्वी पत्रकारांकडून कठीण प्रश्न आला की ते चिडून उत्तर द्यायचे किंवा टाळायचे; पण आता ते अडचणीच्या प्रश्नांवरही मिश्कील उत्तरे देतात.
ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘एलिमिनेशन राऊंड’ असेल. एक-दोन मोठ्या पक्षांचा संकोच होईल असा अंदाज आहे. त्या संकोचलेल्या पक्षांमध्ये आपला पक्ष नसावा, उलट काकांवर मात करत, महायुतीत स्वत:ची उपयोगिता सिद्ध करण्याचाच अजित पवार यांचा प्रयत्न असेल.
वर्चस्व सिद्ध करण्याचे आव्हान
लोकसभेपेक्षाही अजित पवारांना विधानसभेचा पेपर अवघड असेल. कारण, लोकसभेचा निकाल अपघात, अपवाद होता आणि राष्ट्रवादीच्या प्रभावपट्ट्यात वर्चस्व आपलेच आहे हे अजित पवार यांना सिद्ध करायचे आहे.
अजित पवार यांच्या जवळच्या एकेक नेत्यावर शरद पवार जाळे टाकत आहेत. त्या जाळ्यात आतापर्यंत काही जण अडकले असून, आणखी काही अडकण्याच्या मार्गावर आहेत.
पत्नी, मुले यांना सोडून पवार घराण्यातील कोणीही आजच्या घडीला तरी अजित पवार यांच्यासोबत नाही. त्यांच्यासाठी हा अत्यंत कसोटीचा काळ आहे.