Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 06:34 PM2024-11-06T18:34:42+5:302024-11-06T18:35:21+5:30
Jayant Patil On Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे, अजित पवारांना सोबत घेणार का? या प्रश्नाला जयंत पाटलांनी काय दिले उत्तर?
Jayant Patil Ajit Pawar Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीचे निकाल कसे लागतील याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत आहे. त्यात एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात, अशी चर्चाही सुरू झाली आहे. दुसरीकडे निकालानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या दोन्ही मुद्द्यांवरील चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले.
एकनाथ शिंदे-शरद पवार एकत्र येण्याची चर्चा
मुंबई तक या युट्यूब चॅनेलला जयंत पाटील यांनी मुलाखत दिली. एकनाथ शिंदेंसोबत शरद पवार निवडणुकीनंतर आघाडी करू शकतात, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, "एकनाथ शिंदे यांना बरोबर घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आता महायुती सरकारने सांगायचं आहे की, देवेंद्र फडणवीस युतीचा चेहरा असणार की, एकनाथ शिंदे?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अजित पवारांना शरद पवार पुन्हा सोबत घेणार का?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांना सोबत घेऊन सत्तेत बसण्याची वेळ आली, तर त्यांना घेणार का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता.
जयंत पाटील म्हणाले, "दादा (अजित पवार) फार लांब गेलेत आमच्यापासून. लांब गेल्याचं सगळ्या देशाला दिसतंय. ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली, आता ते बरेच लांब गेलेत. ते परत येण्याची शक्यता नाही आणि ते परत आमच्याकडे येणार हा प्रश्न आमच्याकडे उद्भवत नाही. आमच्याकडे सगळ्या जागा आता भरल्या गेल्या आहेत", असे उत्तर जयंत पाटलांनी दिले.