मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय सत्तानाट्यात २ वर्षात २ मोठं बंड झाले. २० जून २०२२ ला शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरेंविरोधात बंड केले. त्यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. शिवसेनेच्या या आमदारांनी भाजपासोबत एकत्र येत राज्यात सरकार बनवलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यानंतर पुढच्या १ वर्षात पुन्हा मोठं बंड झाले. ते म्हणजे अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडून भाजपा-शिंदेसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. २ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता राज्याच्या राजकारणात नवीन वळण आजच्या निकालाने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात जर विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना अपात्र ठरवले तर नवीन मुख्यमंत्री कोण असणार? विधानसभेच्या जागांचे समीकरण कसे असेल? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. महाराष्ट्रात सध्या विधानसभेचे एकूण २८६ आमदार आहेत, त्यात बहुमतासाठी १४४ आमदारांचे पाठबळ हवे. जर शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरले तर आमदारांची संख्या २७० इतकी होईल. अशावेळी बहुमतासाठी १३६ आमदारांची गरज भासेल.
केवळ भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या आमदारांची संख्या सध्या १८५ इतकी आहे. भाजपाकडे १०४, अजित पवारांकडे ४१ तर शिवसेना शिंदे गटाकडे ४० आमदार आहेत. १६ आमदार अपात्र घोषित केले तर शिंदे गटाकडे २४ आमदारांचे संख्याबळ राहील. त्यामुळे सरकारचा नंबर गेम १६९ आमदारांवर येईल जे बहुमताच्या १३६ आमदारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आमदार अपात्र झाले तरी महायुतीच्या सरकारला कुठलाही धोका नाही. परंतु त्यामुळे सरकारमध्ये नेतृत्व बदल होणार हे निश्चित आहे. अपात्र झाल्यानं एकनाथ शिंदेंना राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर पुन्हा विधिमंडळ नेता निवडावा लागणार. नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली पुन्हा वेगाने होणार अशावेळी अजित पवारांना संधी मिळेल का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
अजित पवारांच्या हाती कमान जाणार?अजित पवार जेव्हापासून या सरकारमध्ये सहभागी झालेत तेव्हापासून ते मुख्यमंत्री होतील अशी विधाने समोर येत आहेत. बहुमतात असतानाही भाजपाला अजित पवारांची गरज का पडली? शिंदेंना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री बनवतील अशी चर्चा होऊ लागली. आता जेव्हा विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेचा निकाल सुनावणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार मुख्यमंत्री बनणार की केवळ किंगमेकर राहणार या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. राजकीय परिस्थिती बदलली तर अजित पवार किंगमेकर बनून पुढे येतील. सरकारकडे १६९ आमदारांचे पाठबळ राहील त्यात अजित पवारांचे ४० आमदार आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या पाठिंब्याशिवाय सरकार टिकणं कठीण होईल. सत्ता वाचवण्यासाठी आणि बहुमत टिकवण्यासाठी भाजपाला अजित पवारांची गरज भासेल. अशावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री करणे भाजपासाठी सोयीचे ठरेल.