Baban Shinde-Sharad Pawar, madha assembly elections 2o24: लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना भाजपला चकवा देत विजयसिंह मोहिते पाटलांना सोबत घेत भाजपला माढ्यात धक्का दिला. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा विधानसभा मतदारसंघात हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांनी सलग दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे माढ्यात अजित पवारांना धक्का बसण्याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बबन शिंदे अजित पवारांसोबत गेले. आता विधानसभा निवडणकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाल्यानंतर बबन शिंदे यांनी शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट घेतली.
पश्चिम महाराष्ट्रातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चा आहेत. यात एक नाव बबन शिंदे यांचेही आहे.
रणजितसिंह शिंदेंसोबत घेतली होती शरद पवारांची भेट
काही दिवसांपूर्वी आमदार बबन शिंदे यांनी त्यांचा मुलगा आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्यासोबत शरद पवारांची भेट घेतली होती. सहा वेळा आमदार असलेले बबन शिंदे अजित पवारांची साथ सोडणार, या चर्चेला या भेटीमुळेच तोंड फुटले.
पुण्यातील मोदीबाग स्थित असलेल्या घरी बबन शिंदे यांनी भेट घेतली होती. माढा विधानसभा मतदारसंघातून अनेकजण इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता बबन शिंदे यांनी जागा सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापन परिषदेची पुण्यातील मांजरी येथे बैठक झाली. या बैठकीवेळी बबन शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली.
माढ्यातून मुलाला उमेदवारी देण्याची तयारी
बबन शिंदे यावेळी त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे यांना माढातून उभे करण्याच्या तयारीत आहेत. तशा हालचाली त्यांच्याकडून सुरू आहेत. माढा मतदारसंघात बबन शिंदे यांचे लहान बंधू रमेश शिंदे यांनीही सुप्रिया सुळे यांची दिल्लीत भेट घेतली होती. रमेश शिंदे यांचे सुपुत्र धनराज शिंदेंही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.
लोकसभा निवडणुकीत माढ्यात 'तुतारी' जोरात वाजल्याने आता इच्छुकांकडून शरद पवारांच्या पक्षाकडून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धनराज शिंदे तुतारीवर उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे मुलाला निवडणूक जड जाऊ शकते, याचा विचार करून बबन शिंदे अजित पवारांची साथ सोडून पवारांकडे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जेणेकरून मुलासमोर आव्हाने कमी होतील. त्यामुळे माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.