मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये अभिनेते, अभिनेत्रींना राजकारणाचे वेध लागलेले आहेत. उर्मिला मातोंडकरने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारीची माळ गळ्यात घालून घेतली. आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारदेखील राजकीय क्षेत्रात नशीब आजमावणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अक्षयने काही तासांपूर्वीच एक कोड्यात टाकणारे ट्विट केल्याने या चर्चा झडत आहेत. मात्र, अक्षयनेच या चर्चांना पूर्णविराम देत आपण निवडणूक लढवणार नसल्याचे ट्विट केले आहे.
अक्षय कुमारने केलेल्या ट्विटमध्ये, 'आज एका अनोळखी आणि अलिखित क्षेत्रामध्ये प्रवेश करणार आहे. जे याआधी कधी केले नाही ते करणार आहे. उत्सुक आणि निराशही आहे. संपर्कात रहा.' असे म्हटले आहे. या त्याच्या ट्विटवरून अक्षयकुमार त्याच्यासाठी नव्या असलेल्या एखाद्या क्षेत्रामध्ये प्रवेश करणार आहे, हे नक्की. तसेच आजवर त्याने जी गोष्ट केली नसेल ती गोष्ट तो करणार आहे. महत्वाचे म्हणजे हे क्षेत्र अस्थिरही असेल. म्हणजेच या क्षेत्रातील भवितव्याबाबत कोणीत काही सांगू शकत नाही. असे कोणते क्षेत्र असेल? राजकारण तर नाही ना... नाही.
अक्षयकुमारचा दानशूरपणा आणि त्याचे स्टारडम तर सर्वांनाच माहिती आहे. याचा वापर कोणताही पक्ष करण्याचा विचार करू शकतो. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आणि काँग्रेस, भाजपासारख्या पक्षांना असेच स्टारडम असलेले चेहरे हवे आहेत. यामुळे अक्षयच्या या ट्विटनंतर लगेचच तो भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतांवर चर्चा होऊ लागली होती. यावर अक्षयकुमारने चार तासांनी खुलासा करत राजकारणात जाणार असल्याची अफवा असल्याचे म्हटले आहे.
माझ्या मागच्या ट्विटला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. पण मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही., असे त्याने ट्विट केले आहे.
अक्षयकुमार भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून अक्षयला भाजपा उमेदवारी देऊ शकते. गेल्यावर्षी झालेल्या पंजाबमधील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा-अकाली दलाला सत्ता गमवावी लागली होती. यामुळे अक्षय कुमार भाजपात आल्यास त्याच्या स्टारडमचा पंजाबमधील जागांवर फायदा होऊ शकतो. यामुळे अक्षयच्या भाजपा उमेदवारीवर चर्चा होत होती. मात्र, ही अफवा ठरली आहे.