ठाकरे सरकारमध्ये बच्चू कडूंना मिळणार मंत्रीपदाची संधी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 11:27 AM2019-12-01T11:27:49+5:302019-12-01T11:27:57+5:30
बच्चू कडू आपल्या अनोख्या आंदोलनांसाठी राज्यात सर्वांना परिचित आहे. त्यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर प्रदीर्घ काळ सुरू असलेला सत्ता स्थापनेचा पेच अखेर संपुष्टात आला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने शनिवारी बहुमत सिद्ध केले असून विधानसभा अध्यक्षांची देखील निवड झाली आहे. आता मंत्रीपदाच्या वाटपाची प्रतीक्षा आमदारांना लागलेली आहे. त्यासाठी अनेक आमदारांनी तयारी सुरू केली आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात अपक्ष आमदार आणि शेतकरी प्रश्नी आक्रमक होणारे बच्चू कडू यांची वर्णी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
गोरगरिबांच्या प्रश्नासाठी कडू हे नेहमीच आक्रमक असतात. अनेकदा सामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी कायदा देखील हातात घेतला आहे. कडू यांच्या प्रहार संघटनेचे दोन आमदार आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच मंत्रीपदाची इच्छाही व्यक्त केली आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना शेती प्रश्नांची फारशी माहिती नसल्याचे आरोप झालेले आहेत. त्यातच शिवसेनेकडे शेतीची जाण असलेला नेता दिसत नाही. अशा स्थितीत कडू यांना मंत्रीपद दिल्यास शिवसेनेविषयीची तक्रार कमी होऊ शकते. बच्चू कडू आपल्या अनोख्या आंदोलनांसाठी राज्यात सर्वांना परिचित आहे. त्यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.