बच्चू कडू एकनाथ शिंदेंची साथ सोडणार? ११ वाजता निर्णय जाहीर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 09:51 AM2023-07-13T09:51:17+5:302023-07-13T09:53:09+5:30
बच्चू कडू काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे
Bacchu Kadu in Eknath Shinde: राज्यात सध्या मंत्रिपदाच्या खातेवाटपाची जोरदार चर्चा आहे. भाजपा-शिवसेना सरकारमधील अनेक आमदारांनी मंत्रिपदाची अपेक्षा असतानाच, राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सामील झाला. त्याला आता मंत्रिपदाची शर्यत अधिकच तीव्र झाल्याचे दिसते. मुंबईला काल काही आमदारांना बोलावण्यात आले होते. त्यानंतर काल प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू मुंबईहून स्वगृही परतले. आज पुन्हा काही आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. त्यामुळे खातेवाटपाची चर्चा अधिक वेगवान झाली असल्याचे बोलले जात आहे. अशा वेळी बच्चू कडूंना मंत्रिपद मिळणार का? त्यांना शिंदे सरकारमध्ये जागा मिळणार की ते शिंदेंची साथ सोडणार, याबाबतचा महत्त्वाचा निर्णय ते ११ वाजता जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ आणि माध्यमांशी संवाद साधू असे त्यांनी सांगितले.
"मला कोणाचा फोन आला? आला असेल तर कोणाचा? त्यात काय बोलणं झालं? या सगळ्याबद्दल आता मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. माझे कार्यकर्ते माझ्यासोबत गेली २० ते २५ वर्षांपासून आहेत. त्यानंतरच मी ठरवणार आहे की या सरकारमध्ये पुढे जायचं की मागे यायचं की आणखी काही वेगळा विचार करायचा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ११ वाजता मिळतील. कारण आज मी ११ च्या सुमारास १५-२० मिनिटांची पत्रकार परिषद किंवा पत्रकारांशी संवाद साधणार आहे. त्यात मी माझी भूमिका स्पष्ट करेन," असे बच्चू कडू यांनी सांगितले.