लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. उमेदवारी न दिल्याने नाराज असलेल्या खासदार भावना गवळी या बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गवळी यांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंच्या सांगण्यावरून दोन दिवसांपूर्वी उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांनी गवळी यांची भेट घेतली होती. परंतु त्यातही काही तोडगा निघाला नसल्याचे दिसत आहे.
आजच्या आढावा बैठकीला भावना गवळी या गैरहजर राहणार असल्याचे त्यांच्या गोटातून सांगण्यात येत आहे. सलग पाचवेळा यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघाचे गवळी यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोध बंड केले तेव्हा भविष्याचा विचार करूनच गवळी या शिंदे सेनेत दाखल झाल्या होत्या. परंतु भाजपाच्या सांगण्यावरून अंतर्गत सर्व्हेचे कारण देत गवळी यांचे तिकीट कापण्यात आले.
आता याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या घटकेला शिंदेंनी यवतमाळ -वाशिम साठी उमेदवार जाहीर केला. राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे गवळी या नाराज असून त्याचा फटका या जागेवर बसण्याची शक्यता आहे. आता गवळी यांच्यासमोर पुन्हा ठाकरे सेनेत जाण्याचा पर्याय राहिलेला नाही. तसेच माजी खासदार झाल्यानंतर पुढे राजकीय भवितव्य काय याचाही काही नेम नाही. यामुळे गवळी आता कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भावना गवळी यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे. गवळी यांनी काही कार्यकर्त्यांसह शिंदेंची भेट घेतली होती. परंतु यानंतरही गवळी यांची नाराजी दूर झालेली नाहीय. यामुळे गवळी या आजच्या बैठकीला येतात की दांडी मारतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.