मुंबई : महाराष्ट्रासहित नऊ राज्यांत रिक्त असलेल्या राज्यसभेच्या १२ जागांसाठी येत्या ३ सप्टेंबर रोजी निवडणुका होणार असून, त्याच दिवशी निकाल लागेल. यात महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे राज्यसभा सदस्य लोकसभेवर गेल्याने या दोन जागा रिक्त होत्या. महायुतीचे विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता दोन्ही जागा त्यांनाच मिळणार हे स्पष्ट आहे. मात्र, भाजप दोन्ही जागा स्वतःकडे घेणार की एक जागा अजित पवार यांना देणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
सातारच्या बदल्यात उदयनराजे भोसले यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेची जागा आम्हाला मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार भाजप आता राज्यसभेची एक जागा त्यांना देणार का याबाबत लवकरच निर्णय होईल. महायुतीमध्ये तसा निर्णय झालेला आहे, असेदेखील पवार यांनी म्हटले होते. मात्र याबाबत भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
भुजबळ की पाटील? वाई येथे प्रचारसभेत अजित पवार असेही म्हणाले होते की, तुम्ही उदयनराजे भोसले यांना लोकसभेवर पाठवा, नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवू. नितीन पाटील हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. अजित पवार गटाचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे ते बंधू आहेत.
छगन भुजबळ यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे. एक जागा अजित पवार गटाला मिळाली तर भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवले जाईल की शब्द दिल्याप्रमाणे नितीन पाटील यांना संधी दिली जाईल, याबाबत उत्सुकता आहे.
भाजपकडून कोण? भाजपकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे. लोकसभेला उमेदवारी नाकारण्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी की विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे नाव निश्चित करावे याबाबत पक्षात खल सुरू आहे.