बारामती - इंदापूर मतदारसंघात महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार या शक्यतेने भाजपाचे नेते आणि या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन पाटीलशरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील, तुतारी चिन्हावर लढतील असं बोललं जातंय. मात्र याच चर्चेवर शरद पवारांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं मोठं विधान करत हर्षवर्धन पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशावर भाष्य केले आहे.
बारामती इथं पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, इंदापूरात बदल घडेल अशी स्थिती सध्या आहे. काही मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते ही जागा आमची आहे. मित्रपक्षांनाही जागा द्यावी लागते. आघाडी म्हटल्यावर तडजोड करावी लागते. काही जागा सोडाव्या लागतील. ज्यांच्यासाठी जागा सोडल्या त्यांच्यासाठी कामही करावे लागेल. निवडणुकीत ज्यांनी कष्ट केले त्या कार्यकर्त्यांचे ऐकावे लागेल. आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल घेऊन तुम्ही कामाला लागा असं हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर पवारांनी म्हटलं.
तसेच लोकांचे मत, कार्यकर्त्यांचे मत ऐकल्यानं आपल्याला यश मिळालं. कुठेही गेले तरी हजारोंच्या संख्येने गर्दी होते. या निवडणुकीत काहीही झालं तरी जिंकायचं हे लोकांनी ठरवलं. चांगले निकाल लागतील यात शंका नाही. संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत. प्रत्येक तालुक्यात सर्व्हे केला जाईल. इच्छुक उमेदवारांना नाही तर सामान्य कार्यकर्त्यांना काय वाटते यावरून निर्णय घेतले जातील. पुढच्या ८-१० दिवसांत जागावाटपाचं काम संपवावं लागेल. निवडणुकीचे मतदान १५-२० नोव्हेंबर काळात होईल असा माझा अंदाज असल्याचंही शरद पवारांनी सांगितले.
दरम्यान, पुढच्या काही दिवसात जागेचा निर्णय होईल. आपल्या जिल्ह्यात उमेदवारांची संख्या फार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि लोकांच्यात चर्चा सुरू झाली आहे. इंदापूरात काय होईल अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सगळ्यांना विचारुन निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता बघितली जाईल असं शरद पवारांनी स्पष्ट केले.