Indapur Vidhan Sabha Election 2024, Harshvardhan Patil: राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे पक्षांतर करणार असल्याची कुजबूज जोरात सुरू आहे. हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होत आहे. पक्षांतराच्या या चर्चांवर हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्यांदाच मौन सोडले आणि सूचक संकेत दिले.
हर्षवर्धन पाटील यांनी एका मुलाखतीत बोलताना त्यांची भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीआधी काही भाजपच्या नेत्यांनी पक्षांतर केले आहे. तुम्ही असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहात का? असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांना विचारण्यात आला होता.
हर्षवर्धन पाटलांची पक्षांतर करण्याबद्दल भूमिका काय?
प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, "महायुती म्हणून अजून तरी काही निर्णय घोषित झालेला नाही. महायुतीमधील एखाद्या पक्षाच्या नेत्याने सांगितले की, आमचा उमेदवार ठरला आहे. तर तो त्या पक्षाचा झाला. मी महायुतीबद्दल बोलतोय."
"मला तरी अद्याप महायुती म्हणून कोणतेही विधान केल्याचे दिसत नाही. मी पण राजकारणात ३५-३६ वर्षांपासून काम करणारा कार्यकर्ता आहे. मी स्वतःच्या ६ निवडणुका लढलोय आणि इतरांच्या जवळपास १२ निवडणुकांमध्ये मी सहभाग घेतला आहे", असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
निवडणूक लढवण्यासाठी मतदारांचा माझ्यावर दबाब -हर्षवर्धन पाटील
"मला १७-१८ निवडणुकांचा अनुभव आहे. मी काही फार मोठा अगदी राष्ट्रीय स्तरावरचा नेता नाहीये. आमचे तालुक्यात फिरणे सुरू आहे. आम्ही लोकांमध्ये असतो. आमच्या मतदारसंघातील लोकांचा प्रचंड आग्रह आहे की, 'मी उभे राहिले पाहिजे. शेवटी आम्ही जनता आहे. आम्ही तुमचे मतदार आहोत. बाकीचे राज्यातील राजकारण काय होईल ते आम्हाला माहिती नाही.' हा माझ्या मतदारसंघातील जो मतदार आहे, तो कधीही असा समोर येत नाही", असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी अप्रत्यक्षपणे मतदारांचा निवडणूक लढवण्यासाठी दबाब असल्याचे विधान केले.
हर्षवर्धन पाटील पुढे बोलताना म्हणाले की, "माझा मतदार आता खुलेआम बोलायला लागला आहे. मलाही ही गोष्ट आमच्या वरिष्ठांच्या कानावर घालावी लागणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही (भाजप नेते) आम्हाला यासंदर्भातील अंतिम निर्णय सांगा. तुम्ही काय करणार आहेत? डेडलाईन अजून दिली नाहीये."
"मला असे वाटते की, त्यांनाही (भाजप वरिष्ठ) या गोष्टी माहिती आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती असतात. सगळीकडे माहिती जात असते. सूत्र असतात आणि साहजिक आहे की, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने माणसांना जवळ करण्याचा प्रयत्न करणारच आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे वेगळे आहे. महाराष्ट्रातील मतदार वेगळा आहे. मतदारांची विचार करण्याची पद्धतही वेगळी आहे", असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी सविस्तर भाष्य केले.