मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी रात्री अमित ठाकरेंसह मुंबई, राज्यभरातील उमेदवारांची यादी जाहीर केली. मुंबईतील माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढणार आहेत. याठिकाणी शिंदे सेनेच्या तगड्या उमेदवारासोबत अमित ठाकरेंना दोन हात करावे लागणार आहेत. उद्धव ठाकरे उमेदवार देतात की नाही यावरून या मतदारसंघातील बरीच समीकरणे अवलंबून आहेत. अशातच राज ठाकरेंनी जशी भाजपाला बिनशर्त पाठिंबा देत मदत केलेली तशी आता भाजपा करणार का, असाही प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
विधानसभेला राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजपा पाठिंबा देणार का, या प्रश्नावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निवडून आलेले आमदार त्यात केवळ संदिपान भुमरे सोडून सगळ्यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. यामुळे आमच्यात मैत्रीपूर्ण लढतीची काही चर्चा झालेली नाही. तसेच भाजपा पाठिंबा देणार की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. राज ठाकरे दिलदार व्यक्ती आहेत, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
याचबरोबर शुक्रवारी मी दुपारी साडेबारावाजता फॉर्म भरणार आहे. माझ्यासोबत राज ठाकरे, शर्मिला ठाकरे येणार आहेत. मी इलेक्शन खेळतो लढत नाही. मागच्या वेळी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजय चौधरींना फोन करणारा पहिला मी होतो, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
संदीप देशपांडे, अविनाश जाधव, नयन कदम, गजानन काळे, महेंद्र भानुशाली यांची नावं या यादीत आहेत. त्यात शिवडीतून बाळा नांदगावकर यांच्या नावाचा यादीत समावेश नसला तरी राज यांनी याआधीच एका कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा केली होती. यादीत पहिल्या क्रमांकावर विद्यामान आमदार राजू पाटील यांच्या नावाचा समावेश केलाय. निष्ठावंतांसह मतदार संघांचा स्थानिक पातळीवर आढावा घेऊन ज्या ज्या मतदार संघांमध्ये प्रस्थापित उमेदवारांना आव्हान देऊ शकतील अशा चेहऱ्यांना संधी दिलेली दिसून येते. यात खडकवासल्यात मनसेचे गोल्डनमॅन रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे, हडपसरमध्ये साईनाथ बाबर, कोथरुडमध्ये किशोर शिंदे, श्रीगोंदा संजय शेळके, आष्टी कैलास दरेकर अशा नावांचा समावेश आहे.