सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार?; देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर निवडणुकीबाबत ठेवला सस्पेन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 05:36 PM2023-01-13T17:36:04+5:302023-01-13T17:36:35+5:30
सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला मी जरूर गेलो. त्याठिकाणी बाळासाहेब थोरातही होते. इतर पक्षातील नेतेही होते. राजकीय पक्षात एकमेकांच्या कार्यक्रमात जाणे नवीन नाही असं फडणवीस म्हणाले.
मुंबई - नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत योग्यवेळी योग्य भूमिका घेऊ असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही सस्पेन्स कायम ठेवला आहे. नाशिकमध्ये भाजपाने अधिकृत कुणालाही उमेदवारी दिली नाही. त्यातच काँग्रेसनं सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देऊनही त्यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरला नाही. सुधीर तांबे यांनी माघार घेत चिरंजीव सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला. सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नाशिकमध्ये भाजपा सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार असलं मानलं जात असले तरी राजकारणात जोवर अंतिम निर्णय होत नाही तोवर काहीही स्पष्टता नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नाशिक निवडणुकीबाबत योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ. सत्यजित तांबे युवा नेतृत्व आहे. त्यांचे काम चांगले आहे. सर्व राजकीय निर्णय धोरणांप्रमाणे योग्यवेळी करावे लागतात. त्यानुसार यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे.
त्याचसोबत सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला मी जरूर गेलो. त्याठिकाणी बाळासाहेब थोरातही होते. इतर पक्षातील नेतेही होते. राजकीय पक्षात एकमेकांच्या कार्यक्रमात जाणे नवीन नाही. योग्य वेळी सर्व गोष्टी तुमच्यासमोर येतील. वाट पाहा. आम्ही तिथे कोण उमेदवार द्यावा यासाठी प्रयत्न करत होतो. विखेंनी तिथे उमेदवारी घ्यावी अशी आमची इच्छा होती. परंतु काही कारणात्सव त्यांनी असमर्थता दाखवली अशीही माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
बंडखोर उमेदवाराला पाठिंबा नाही - काँग्रेस
सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही असं स्पष्ट विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले म्हणाले की, नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. मात्र बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली आहे असा आरोप त्यांनी केला.