मुंबई - भाजप आणि शिवसेनेची २०१९ मध्ये लोकसभेला युती होती तेव्हा शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजप आपल्या दोन मित्र पक्षांना मिळून २२ जागा देणार आहे. आपलीच खरी शिवसेना असा दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपलीच राष्ट्रवादी खरी असा दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यामुळे नुकसान होणार असल्याचे आकडेवारी सांगते.
फडणवीस यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा जागावाटपाचा महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानुसार भाजप २६ जागा लढेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून २२ जागा लढवतील. याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला २०१९ मधील अविभाजित शिवसेनेइतक्या जागा लढायला मिळणार नाहीत. अविभाजित राष्ट्रवादीने काँग्रेससोबतच्या आघाडीत १९ जागा लढविल्या होत्या आणि चार जिंकल्या होत्या.
फॉर्म्युला ठरलेला नाही : फडणवीस - उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी रात्री पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जागा वाटपाचा महायुतीत फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. गेल्या वेळी ज्या पक्षाने ज्या जागा लढवल्या होत्या त्या त्यांच्याकडे राहतील पण बदल करायचे असल्यास चर्चा होईल.
मविआतही तोच फॉर्म्युला? - महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडूनही अशाच फॉर्म्युल्याचा आग्रह धरला जाऊ शकतो. ठाकरे गटाकडे पाच खासदार आहेत, तर राष्ट्रवादीतही फूट पडलेली आहे. त्यामुळे त्याआधारे जागावाटप व्हावे, अशी भूमिका काॅंग्रेस मांडू शकते.
कसे असेल जागावाटपाचे गणित?शिंदेंसोबत लोकसभेचे १३ खासदार आहेत, सर्व १३ खासदारांना तिकिटे मिळणार की दोनतीन जागा बदलून दिल्या जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. १३ जागा शिंदे गटाला दिल्या तर उर्वरित ९ जागा अजित पवारांच्या वाट्याला जातील. अजित पवार यांच्यासोबत आज फक्त सुनील तटकरे (रायगड) हे एकमेव लोकसभा सदस्य आहेत. जाणकारांच्या मते, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या २२ जागांपैकी फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्युला वापरून प्रत्येकी ११ जागा द्याव्यात अशी भूमिका राष्ट्रवादीकडून घेतली जाऊ शकते. शिंदेंच्या शिवसेनेचा त्यास विरोध असेल. याचवेळी विधानसभेसाठीचेही जागावाटप करण्याचा आग्रह दोन्ही मित्र पक्षाकडून होऊ शकतो.
२०१९ मध्ये भाजपने २५ जागा लढविल्या होत्या आणि तब्बल २३ जिंकल्या होत्या. यावेळी २६ जागा लढविण्याचा इरादा असून वाढीव एक जागा जास्त लढून महायुतीमध्ये दोन पक्षांना सोबत घेतले तरी आपण आपल्या जागा कमी होऊ दिलेल्या नाही असा संदेश भाजप नेतृत्व पक्षजनांना देऊ पाहत आहे असे दिसते.