देवेंद्र फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पाहावा, थिएटर बुक करतो; काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 04:25 PM2024-03-31T16:25:49+5:302024-03-31T16:27:27+5:30

Congress vs BJP: सावरकर सिनेमावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली. त्याला काँग्रेसनं पलटवार करत देवेंद्र फडणवीसांनाही खोचक सल्ला दिला आहे. 

Will Book Theatre for Devendra Fadnavis to watch Munna Bhai MBBS movie - Congress Nana Patole | देवेंद्र फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पाहावा, थिएटर बुक करतो; काँग्रेसचा टोला

देवेंद्र फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पाहावा, थिएटर बुक करतो; काँग्रेसचा टोला

मुंबई - Nana Patole on Devendra Fadnavis ( Marathi News ) राहुल गांधी जर सावरकर चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खं थिएटर बुक करेन अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. मोदींवरचा सिनेमा फ्लॉप झाला. नितीन गडकरींवरील हायवे मॅन सिनेमा फ्लॉप झाला. गोडसेवरील चित्रपट फ्लॉप झाला आणि सावरकर चित्रपटही फ्लॉप झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पाहावा, गांधी विचारासाठी फडणवीसांनी हा चित्रपट पाहायला हवा त्यांच्यासाठी थिएटर बुक करतो असा टोला पटोलेंनी फडणवीसांना लगावला. 

नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे तानाशाही सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी तसेच लोकशाही व्यवस्था व संविधान टिकवण्यासाठी हा लढा सुरु आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भिती दाखवून भाजपा दुसऱ्या पक्षातील लोकांना पक्षात प्रवेश देते पण त्याचाही काही फरक पडत नाही. महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून पहिल्या टप्यातील विदर्भातील पाचही जागांवर काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. मोदी सरकारची जुमलेबाजी व फेकुगिरी आता चालणार नाही, लोकसभा निवडणुकीत जनता भारतीय जनता पक्षाच्या तानाशाही सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राहुल गांधी यांच्याशी तुलना करु नका, राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देशाच्या जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली आहे, टिंगळटवाळी करण्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्या व जनतेच्या मुलभूत प्रश्नांवरही लक्ष द्या असा खोचक सल्लाही नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. 

सोलापूरचे माजी आमदार दिलीप मानेंचा काँग्रेस प्रवेश

सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने व वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदिश माळी यांनी समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. नाना पटोले यांनी दोघांचेही काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, दिलीप माने हे काँग्रेस पक्षाचेच होते पण मध्यंतरी इतर पक्षात गेले परंतु योग्यवेळ पाहून ते आज पुन्हा स्वगृही परतले आहेत. कार्यकर्त्यांशी चांगले संबंध असलेला नेता अशी त्यांची ओळख असून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात पक्षाला आणखी बळ मिळाले आहे. भाजपाकडून प्रणिती शिंदेंनाही ऑफर होती पण आम्ही काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Will Book Theatre for Devendra Fadnavis to watch Munna Bhai MBBS movie - Congress Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.