मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज विधानसभेमध्ये अभिभाषण केले. यावेळी त्यांचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वागत केले.
आज विधानसभेत राज्यपालांनी मराठीतून भाषण केले. यावेळी त्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडला. पाऊस लहरी झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. या शेतकऱ्यांना तत्काळ सहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध असेल. आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन राज्यपालांनी दिले.
शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. बेरोजगारांना नोकऱ्या उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न होतील. भूमीपुत्रांसाठी आरक्षण ठेवण्यासाठी आम्ही कायदा करणार आहोत. महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्या जातील. आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलींसाठी शिक्षण, रोजगार देण्यासाठी प्रयत्न करील. वसतीगृहे बांधण्यासाठी प्रयत्न करेल, असे राज्यपालांनी सांगितले.