पुणे : बलात्काराचे गांभीर्य जातीवर ठरविले जाणार असेल आणि ज्या जातीच्या मुलीवर बलात्कार होईल त्यांच्याकडून मोर्चा काढला जात असेल तर हा समाज खरेच सुसंस्कृत आहे का, असा परखड सवाल माजी खासदार व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी शुक्रवारी येथे केला.नागपूरच्या मारवाडी फाऊंडेशनतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. कसबे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गांधीजींना चुकीच्या पद्धतीने समोर आणले जात आहे. गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जनचळवळ केली आणि फॅसिझमला रोखले. कारण फॅसिझम आला असता तर सामंतशाही टिकली असती. ब्राम्हणांचे श्रेष्ठत्व गेले म्हणूनच युती करून गांधींना बदनाम करण्याचे षडयंत्र आखले जात आहे.’’ (प्रतिनिधी)
'बलात्काराचे गांभीर्य जातीवर ठरवणार?'
By admin | Published: October 15, 2016 4:09 AM