सोलापूर/ अकलूज : भाजप सरकार महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या किल्ले गडावर पर्यटनाच्या माध्यमातून हॉटेल काढून शिवरायांच्या इतिहासकालीन किल्ले गडावर छम छम वाजवणार का? असा सवाल करीत इतिहास जतन करायचे सोडून हे सरकार वेगळंच काही करून महाराष्ट्राला अपमानित करीत आहे, अशी टीका राष्टÑवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.
अकलूज येथील श्रीराम मंदिराच्या पटांगणात आयोजित राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, आमच्याबरोबर कुस्ती लढायला कोणी तयार नाहीत. परंतु आपण कुस्ती परिषदेचे अध्यक्ष असून, नवीन पैलवान तयार करतो. चिंतेचे वातावरण नाही तर मोदी, शहांसह भाजपच्या इतर राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात का येत आहेत.
भाजपच्या राज्यात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. त्या सर्व शेतकºयांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. १०० ते २०० श्रीमंतांनी ८१ हजार कोटी कर्जे घेऊन थकविल्याने बँका अडचणीत आल्या आहेत. सरकारने रिझर्व्ह बँकेकडून घेऊन ते पैसे भरले. परंतु या सरकारला शेतकºयांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत. सर्वसामान्यांना मात्र कर्ज थकितासाठी नोटिसा पाठवतात, असे ते म्हणाले.यावेळी सुभाष पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, आ. रामहरी रूपनवर यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
पाच वर्षांत काय दिवे लावले हे सांगा- शेतकरी आत्महत्या, आर्थिक मंदी, बेरोजगारीचा प्रश्न असताना राज्यकर्ते धनदांडग्यांच्या हिताची धोरणे राबवित आहेत. काँग्रेस-राष्टÑवादीच्या कार्यकाळात काय केलं विचारणाºया भाजपवाल्यांनी तुम्ही काय दिवे लावलेत हे सांगावे. सत्ता तुमची आहे, काय केलं सांगण्याची जबाबदारी तुमचीच असल्याचे सांगत राष्टÑवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर टीकास्त्र सोडले.