लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे शहर काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रदेश पातळीवरुन हालचाली सुरु झाल्या असून सध्याची शहर कार्यकारिणी बरखास्त करुन स्थानिक पातळीवर निवडणुका घेऊन शहर अध्यक्षासह इतर पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती कॉंग्रेस सूत्रांनी दिली.शहर काँग्रेसमध्ये सध्या कोणाचा पायपोस कोणात नाही. महापालिका निवडणुकीनंतर शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. परंतु त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे शहरात काँग्रेसचे अस्तित्व शून्यवत आहे. भाजपा-शिवसेना हे सत्ताधारी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा विरोधी पक्ष यांचे मेळावे, शिबीरे किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोर्चे, आंदोलने सुरु आहेत. परंतु काँग्रेसकडून कोणत्याही हालचाली होतांना दिसत नाहीत. त्यामुळे या तोळामासा झालेल्या पक्षाला पडझडीतून सावरण्यासाठी प्रदेश पातळीने हालचाली सुरु केल्या आहेत. या हालचाली वेळीच केल्या गेल्या तर काँग्रेसला ठाणे शहरात नक्की उभारी मिळेल, असे कार्यकर्त्यांना वाटते.येत्या चार ते पाच दिवसात पंजाबचे काँग्रेसचे नेते करण सिंग हे ठाण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते शहर अध्यक्ष, नगरसेवक तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार आहेत. तसेच, पक्षात सक्रिय कोण आहे, कोण कशा पध्दतीने काम करतो, शहर अध्यक्षपदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती केली तर दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी सुधारेल, याची माहिती गोळा केली जात आहे. त्याअनुषंगाने महत्त्वाच्या पदांबाबत निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, याला स्थानिक पातळीवर विरोध होण्याची शक्यता आहे.
शहर अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार?
By admin | Published: July 12, 2017 3:35 AM