इंदापूरमध्येही होणार नगरची पुनरावृत्ती ? विखेंप्रमाणेच हर्षवर्धन पाटीलही...!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 05:43 PM2019-07-26T17:43:55+5:302019-07-26T17:50:13+5:30
एकूणच राष्ट्रवादीने इंदापूर सोडण्यास नकार दिल्यास, हर्षवर्धन पाटील अडचणीत सापडणार आहे. तर भरणेंना नाकारले तर भरणे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला असून या जागेवर तोडगा काढण्याचे आव्हान आघाडीसमोर आहे.
मुंबई - राज्यात पराभवाचा धक्का मिळाल्यानंतरही विरोधात बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापही सामोपचाराने निवडणुकीला सामोरे जाता आलं नाही, हे लोकसभा निवडणुकीत सिद्ध झाले. देशात बलाढ्य झालेल्या भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याचे आवाहन उभय पक्षांकडून केले जाते. परंतु, ऐनवेळी आडमुठे धोरणांमुळे महत्त्वाच्या जागा गमवाव्या लागतात.
लोकसभा निवडणुकीत हे प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळाले. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे. इंदापूर मतदार संघातून २०१४ मध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. तेथून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विजयी झाले होते. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे. परंतु, हा मतदार संघ राष्ट्रवादी सोडण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाटाघाटी करण्यासाठी चर्चा झाली होती. परंतु, राष्ट्रवादीने ती जागा काँग्रेसला देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेले काँग्रेसनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ते नगरमधून निवडूनही आले. त्यापाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपवासी झाले. त्यामुळे नुकसान काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे झाले. राष्ट्रवादीची जागा गेली तर काँग्रेसचे विरोधीपक्षनेते गेले.
इंदारपूरमध्ये नगरचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने जागा न सोडल्यास हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पाटील यांनी देखील एका कार्यक्रमाला आमंत्रण देण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेतली. त्यामुळे पाटील यांच्या पक्षांतराला उधाण आले आहे. यदा कदाचित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास, इंदापूरमधून पाटील यांच्या विजयाची शक्यता वाढणार आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळेल. त्यामुळे सहाजिकच राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना हे नुकसानीचेच ठरणार आहे.
एकूणच राष्ट्रवादीने इंदापूर सोडण्यास नकार दिल्यास, हर्षवर्धन पाटील अडचणीत सापडणार आहे. तर भरणेंना नाकारले तर भरणे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला असून या जागेवर तोडगा काढण्याचे आव्हान आघाडीसमोर आहे.