- मनोहर कुंभेजकरमुंबई : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा घोळ एकीकडे कायम असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सदस्यांची निवडणूकही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात रामदास कदम (शिवसेना) आणि भाई जगताप (काँग्रेस) यांची विधान परिषदेची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. भाई जगताप हे विधान परिषद आमदार असून सध्या ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांना पुन्हा संधी देण्याऐवजी त्यांच्यावर पालिका निवडणुकीची जबाबदारी कायम ठेवण्याकडे पक्षाचा कल असल्याचे समजते. तसेच त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, डॉ. अमरजीत सिंह मनहास, माजी मंत्री नसीम खान, मधू चव्हाण, सचिन सावंत यांच्यापैकी एका नावाचा विचार होऊ शकतो, असे वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणूक ही भाई जगताप यांची कठोर परीक्षा घेणारी ठरणार आहे. मुंबई काँग्रेसमध्ये पदनियुक्त्या करताना बराच गोंधळ झाला. शिवाय, कापाकापीच्या राजकारणात प्रामाणिक पदाधिकारी बाहेर राहिल्याने पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या २५ जागाही येणे कठीण असल्याचे विधान काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याने केले आहे. गटबाजीच्या तक्रारीकाँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याशी संवाद साधणे कार्यकर्त्यांना कठीण जाते. त्यातच, पक्षाचे राष्ट्रीय सचिव सोनल पटेल व आशिष दुआ यांच्याकडूनही फारसे सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेतच. शिवाय, गटबाजीला प्रोत्साहन देत असल्याच्या तक्रारी आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना किमान एसईओ हे पदही मिळाले नाही, त्याबद्दलही नाराजी आहे.
विधान परिषदेवर काँग्रेस देणार वेगळा चेहरा?; कदम, जगताप यांची मुदत संपणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 8:16 AM