मुंबई - महाराष्ट्रात सत्तेची प्रतिक्षा संपवण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार आहे. राजकीय मैदानात फ्रंटफूटवर खेळण्यासोबत पक्षातील ज्येष्ठ नेते पडद्यामागून मजबूत रणनीती तयार करण्यात गुंतलेले आहेत. काँग्रेसचे असे ४ नेते आहेत ज्यांच्यावर आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातील ३ नेत्यांनी यापूर्वीच काँग्रेसच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
महाराष्ट्रात काही महिन्यात २८८ जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सोबत मिळून जागा लढवणार आहे. याठिकाणी काँग्रेसचा सामना महायुतीसोबत आहे. महायुतीला कुठल्याही प्रकारे सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसनं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यात खालील ४ नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
मधुसूदन मिस्त्री
गुजरातमधील दिग्गज नेते आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे मधुसूदन मिस्त्री यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत स्क्रिनिंग कमिटीचं चेअरमन पद देण्यात आले आहे. तर सप्तगिरी शंकर उल्का, मंसूर अली खान, श्रीवेल्ला प्रसाद यांना स्क्रिनिंग कमिटीचं सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. काँग्रेसमध्ये स्क्रिनिंग कमिटीचं काम जागांनुसार उमेदवारांची यादी तयार करणे. या यादी पैकी एकाला काँग्रेस निवडणूक कमिटी उमेदवारी देते.
मधुसूदन मिस्त्री यांनी लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्र स्क्रिनिंग कमिटीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळळी. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं निवडलेल्या उमेदवारांची यादी इतकी सक्षम होती की १७ पैकी १३ जागांवर उमेदवार विजयी झाले. मिस्त्री याआधी मध्य प्रदेशसह अनेक राज्यात स्क्रिनिंग कमिटीचे चेअरमन राहिले आहेत. त्यांना गांधी कुटुंबाच्या जवळचं मानलं जाते. २०२२ मध्ये काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीतही त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली होती.
शशिकांत सेंथिल
निवडणूक काळात काँग्रेस पक्ष संबंधित राज्यात वॉर रुमची स्थापना करते. या वॉर रुमच्या माध्यमातून काँग्रेस प्रत्येक जागेवरील कॅम्पेन, मतदान प्रक्रिया मॉनेटरिंग करते. वॉर रुममधून निवडणुकी संबंधित तक्रारींचे निराकरणही केले जाते. महाराष्ट्रात काँग्रेसनं वॉर रुमची जबाबदारी शशिकांत सेंथिल यांच्याकडे सोपवली आहे. सेंथिल यांनी याआधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भूमिका निभावली होती. लोकसभा निवडणुकीतही ते वॉर रुमचे प्रभारी होते.
आयएएस नोकरी सोडून राजकारणात आलेले सेंथिल सध्या तामिळनाडूतील त्रिवल्लुर जागेवरून खासदार म्हणून निवडून आलेत. सेंथिल यांना सुरुवातीला तामिळनाडू काँग्रेसचं उपाध्यक्ष बनवलं होते. परंतु त्यानंतर पक्षाकडून त्यांना निवडणूक राज्यांमधील वॉर रुमची जबाबदारी सोपवणं सुरू केले.
महाराष्ट्रात काँग्रेसनं जाहिरनामा तयार करण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याची घोषणा केली. कुठल्याही निवडणुकीत जय पराजयात जाहिरनामा महत्त्वाची भूमिका ठरवतो. कारण जनता जाहिरनाम्याच्या मुद्द्यांवरच पक्षाला मतदान करते. अलीकडे बहुतांश राज्यात काँग्रेसला त्यांच्या जाहिरनाम्यामुळेच विजय मिळाला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे पडद्यामागून धोरण बनवणारे नेते म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनण्याआधी चव्हाण पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री म्हणून काम करत होते. लोकसभा निवडणुकीत प्रचार कमिटीची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
रमेश चेन्निथल्ला
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत मिळून मैदानात उतरणार आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी रमेश चेन्निथल्ला यांच्याकडे आहे. चेन्निथल्ला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत. केरळचे रहिवासी असलेले रमेश चेन्निथल्ला हे संघटनेचे नेते मानले जातात. ते केरळ काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. याशिवाय चेन्निथल्ला केरळ सरकारमध्ये विरोधी पक्षनेते आणि मंत्रीही राहिले आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली होती. राज्यात काँग्रेस आणि भारत आघाडीने एनडीएचा पराभव केला होता. त्यावेळीही रमेश चेन्निथला महाराष्ट्राचे प्रभारी होते.