२०१९ पासून नाट्यमय घडामोडी आणि उलथापालथींमुळे गाजत असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला दिवसागणिक नवनवी वळणं मिळत आहेत. गतवर्षी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड होऊन शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडून शिंदे-भाजपा सरकार सत्तेत आलं होतं. तर आता बरोब्बर एक वर्षानंतर अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडलं आहे. वर्षभरापूर्वी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटून भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडून काही आमदार मंत्रिमंडळात सहभागी होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे.
आमचं काम पाहून अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. एक आठवड्याच्या आत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र काँग्रेसचे काही आमदार सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा मात्र त्यांनी फेटाळून लावली आहे. आता आमच्याकडील जागा भरल्या आहेत, असे ते म्हणाले.
एक वर्षापूर्वी आम्ही सरकार बनवलं होतं, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरून स्थापन केलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती. त्यांचे आदर्श आणि त्यांच्या मार्गावर आम्ही चालत आहोत. एक वर्षापासून येथे सर्वसामान्यांचं सरकार आहे.
आम्ही हे सरकार बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आदर्शांना अनुसरून चालवत आहोत. गेल्या काही वर्षांपासून जी कामं प्रलंबित होती. त्यांना आमच्या सरकारच्या काळात गती देण्यात आली आहेत. आमचं काम पाहूनच अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. मी मुख्यमंत्री आहे आणि हे सरकार सुरळीतपणे चालावं, यासाठी मी प्रयत्नशील असेन, असेही, एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.