20१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अनेक दिग्गज महाराष्ट्रात हरले. फक्त एक जागा निवडून आली. पाच वर्षांनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १७ जागा लढून काँग्रेसने १३ जागा जिंकल्या आणि राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेस नेत्यांनी दाखविलेले ऐक्य, मोदी सरकारविरुद्ध महाविकास आघाडीने उठविलेले रान, कार्यकर्त्यांनी मनावर घेतलेली निवडणूक, एकमेकांच्या प्रभावक्षेत्रात ढवळाढवळ न करता आपले किल्ले शाबूत ठेवण्यावर नेत्यांनी दिलेले लक्ष यामुळे हा विजय मिळाला. ओबीसी, मराठा, दलित, मुस्लीम मतदारांनी मोठी साथ दिली हेही एक महत्त्वाचे कारण होतेच. एरवी गटबाजीचा शाप असलेली काँग्रेस गटतटमुक्त राहिली आणि त्याचा फायदा झाला.
लोकसभेत काँग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता केंद्रामध्ये येऊ शकली नाही, पण महाराष्ट्राने या आघाडीला मोठे यश दिले. दिल्लीत इंडिया आघाडी आधीपेक्षा मजबूत होण्यात महाराष्ट्राचा आणि काँग्रेसचा मोठा वाटा राहिला. आता त्याच मार्गाने राज्यात आघाडीची सत्ता आणायची तर काँग्रेसला लोकसभेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. काँग्रेसचा विजयाचा घोडा लोकसभेला उधळला आणि विधानसभेलाही तो उधळेल, असे चित्र असताना हरयाणात काँग्रेसचे स्वप्न भंग पावले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात काहीसे निराशेचे वातावरण असले तरी हरयाणाच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही, असे स्थानिक नेते सांगत आहेत.
परंपरागत मतदार राखावा लागणारगेल्या काही निवडणुकांमध्ये परंपरागत मतदारांनी काँग्रेसला पाठ दाखविली होती, पण लोकसभेला त्यांनी काँग्रेसला साथ दिली. हा मतदार काँग्रेससोबतच राहील हे सिद्ध करण्यासाठीची ही लिटमस टेस्ट असेल. महाविकास आघाडीत काँग्रेस तर महायुतीत भाजप असे दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत. मित्रपक्षांना सोबत घेऊन काँग्रेसने राज्यात सत्ता मिळविली तर देशातील अन्य राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत सरकार आणण्यासाठीचे मॉडेल म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाईल. तसे होणार की नाही, हे लवकरच ठरेल, घोडा मैदान जवळच आहे.