मुंबई - आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक काँग्रेससह इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्यात येईल. सर्वांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षाची निवड करण्याबाबत पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील शुक्रवारी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून अध्यक्षाची निवड करतील, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले.या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहिले असते तर बरे झाले असते, असे सांगून खा. पवार म्हणाले, भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांना भेटले. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्याबाबत कोर्टाचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी माझ्यासह राज्यातील जनतेला खरा आनंद होईल. पहिल्या टप्प्यात यश आले आहे. दुसºया टप्प्यातही यश मिळेल, अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली.निवडणुका जवळ आल्याने मुंबईत संघटनेला व्यवस्थित असा चेहरा द्यायचा आहे. यश-अपयश येतच असते. परंतु विचार आणि बांधिलकी कायम ठेवायची असते. जुन्या लोकांना बरोबर घेऊन नवीन चेहºयांना संधी द्यायला हवी. अधिक उत्साहाने काम करणारे व सर्व घटकातील लोक पुढे आणण्याची गरज असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.यावेळी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, पक्षाचे उपाध्यक्ष नवाब मलिक, खासदार माजिद मेमन, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.
काँग्रेससह समविचारी पक्षांना घेऊन निवडणूक लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 5:45 AM