मुंबई : भाजपाने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. अखेर शेवटच्या क्षणी दोन्ही पक्षांनी शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. यामुळे शिवसेनेचे नेते राजभवनावर पोहोचले असून अपक्ष आमदार बच्चू कडूही अन्य दोन आमदारांसोबत राजभवनावर दाखल झाले आहेत.
बच्चू कडू यांनी शिवसेना शंभर टक्के सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला. याचसोबत आम्हाला काही नको, शेतकरी मजुरांसाठी आम्ही शिवसेनेसोबत आहोत, अशी प्रतिक्रिय बच्चू कडू यांनी दिली. यावेळी त्यांनी अपक्ष आमदार राजकुमार पटेल, राजेंद्र पाटील आपल्यासोबत असल्याचे सांगितले. यामुळे शिवसेनेला सध्यातरी तीनच अपक्ष पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनी शिवसेना नेत्यांना फोन करण्यास सुरूवात केल्याची बातमी आली होती. यामुळे शिवसेनेला सध्या गरज नसली तरीही अपक्षांनी फोन केल्याने हे आमदार कोण असा प्रश्न पडला होता. यावर कडू यांनी सध्यातरी आम्ही तीनच असल्याचे सांगितले.
शिवसेनेचे सरकार स्थापन झाले तरी आम्ही शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. तसेच शपथविधीबाबत अद्याप आपल्याला काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.