मुंबई - काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे नारायण राणे आता भाजपाकडून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे आता राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या भविष्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे काय करायचे याचा निर्णय आपण येत्या आठवडाभरात घेऊ, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. खासदारपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणाऱ्या राणेंकडे स्वाभिमान पक्षाच्या भवितव्याविषयी विचारणा करण्यात आली."महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या भवितव्याविषयी मी माझ्या समर्थकांशी चर्चा करणार आहे. सर्वांशी चर्चा करून झाल्यावर आठवडाभरात मी पक्षाबाबत निर्णय घेईन.", असे राणेंनी सांगितले. यावेळी राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. काँग्रेसमध्ये असंतुष्ट असलेल्या नारायण राणे यांनी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. सुरुवातीला नारायण राणे राज्यसभेवर जाण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. मात्र, भाजपाने त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवले. काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राणे यांना राज्यसभेची ऑफर अमान्य असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र भाजपाने त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवले होते.
स्वाभिमान पक्षाचे काय करायचे याचा नारायण राणे आठवडाभरात घेणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 8:15 PM