नागपूर - वेगळ्या विदर्भ राज्यासाठी नितीन गडकरींसहविदर्भातील १० खासदारांचा राजीनामा मागणार असल्याचं विदर्भ राज्य आंदोलन समितीनं म्हटलं आहे. संसदेत या खासदारांनी विदर्भ स्वतंत्र्य राज्य व्हावं यासाठी ठराव न केल्यामुळे ही मागणी करण्यात येत आहे. विदर्भाबद्दल खासदारांना प्रेम राहिले नाही. त्यामुळे या खासदारांच्या कार्यालयात जाऊन प्रत्येकाला राजीनामा मागणार असल्याचं समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार यांनी सांगितले आहे.
अरुण केदार म्हणाले की, वेगळ्या विदर्भासाठी भूवनेश्वर येथील अधिवेशनात भाजपानं ठराव केला होता. पण त्याची अंमलबजावणी केली नाही. आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम वेगळा विदर्भ करू असं आश्वासनं भाजपानं दिले होते. हे सत्तेवर आले. मात्र तरीही वेगळा विदर्भ केला नाही. देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री झाले पण वेगळ्या विदर्भाचा विसर त्यांना पडला. त्यामुळे त्यांना आठवण व्हावी यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत विदर्भातील ११ जिल्ह्यात आंदोलन होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आंदोलनाचं नेतृत्व करतील. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड झाले तेव्हा कुठे लोकांचा पाठिंबा होता? राजकीय तुकडे पाडण्यासाठी भाजपानं ते केले. केवळ तेलंगणा राज्य जनआंदोलनातून निर्माण झाले. आज तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे असं अरुण केदार यांनी म्हटलं.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले होते?विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करावा की नाही यासंदर्भात जनमत चाचणी घ्यायला हवी असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यावर भाजपाने भूमिका मांडत लहान राज्यांना भाजपाने नेहमीच समर्थन केले आहे. वेगळ्या विदर्भाची भाजपाची भूमिका कायम आहे. जेव्हा लहान राज्य गठीत होतील तेव्हा विदर्भ वेगळे राज्य झाले पाहिजे अशी केंद्रीय नेतृत्वाला आम्ही विनंती केली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही महिन्यांपूर्वी दिली होती. त्यामुळे आता स्वतंत्र विदर्भासाठी पुन्हा एकदा विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभं राहत असल्याचं दिसून येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"