मुंबई- राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना नारळ देणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मंत्रिमंडळातील जुन्या चेहऱ्यांना डच्चू जेऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं. राज्यातील भाजपा सरकारला ३१ ऑक्टोबरला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत बाकी राहीलेले सगळे प्रकल्प पूर होतील. प्रकल्प पूर्ण करायचं ध्येय गाठायला आम्हाला नक्की यश येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नव्या एनडीएमध्ये नारायण राणे यांना सहभागी करून घेण्याची चिन्हं जास्त आहेत तसंच जुन्या काही मंत्र्यांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात काही समस्या निर्माण झाल्याची कबुली दिली तसंच 25 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सगळ्या लाभार्थी शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे. आमच्याबरोबर सत्तेत असेलली शिवसेना विरोधाची भूमिका घेते हे दुर्देवी आहे. आम्ही जनहितार्थ घेतलेल्या निर्णयावरही शिवसेनेकडून टीका होते, याचा शिवसेनेला फायदा होणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारपेक्षा आमची कामगिरी उत्तमकाँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असतानाच्या परिस्थितीची आत्ताच्या परिस्थितीशी तुलना केली तर आमची कामगिरी उत्तम आहे. पण अजूनही आम्हाला सुधारणा हव्या आहेत. आम्ही पूर्णपणे पारदर्शी प्रशासन केलं असून उर्वरीत सगळे प्रकल्प 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचं ध्येय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं.
कोणाला मिळणार नारळ?राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एमपीमिल कंपाऊंडचा एफएसआय खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप आहे. तर एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर आहे. याशिवाय आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही योग्य आणि वेगळं काम केलं नाही. पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एप्रिल 2016 पासून तब्बल 600 आदिवासी मुलं दगावली. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश आहेत.
त्यामुळे आता कोणत्या मंत्र्यांना मुख्यमंत्री नारळ देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.