मुंबई - राज्याच्या राजकारणात मागील जून महिन्यात सत्तांतर झाले. अनपेक्षितपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे आले. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करताच सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर काही वेळात फडणवीस हे उपमुख्यमंत्री होतील असं कळताच भाजपा नेतेही अवाक् झाले. मागे भाषणात बोलतानाही चंद्रकांत पाटील यांनी ही खंत बोलून दाखवली होती. काळजावर दगड ठेऊन मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर काय होणार असा प्रश्न सर्वांनाच आहे.
याच प्रश्नाचं उत्तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट देणे टाळले, ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. उद्या राजकारणात लोकं काय ठरवतील? आमचे नेते काय ठरवतील? शेवटी नेतृत्व ठरवतं. फडणवीस उपमुख्यमंत्री होतील हा निर्णय नेतृत्वाने घेतला. मान्यच केला. उद्या जर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं नेतृत्वाला वाटलं तर ते निर्णय घेतील. २०२४ चं आता काय ठरले नाही. निवडणुकीनंतर काय होईल याबाबत चर्चा नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले.
त्याचसोबत आमचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे निर्णय घेतील. २०२४ च्या निवडणुकीनंतर काय होईल यावर काहीच भाष्य करता येत नाही. २०२४ पर्यंत मुख्यमंत्री बदलायचं कारणच नाही. नितीश कुमार कमी जागेवर निवडून आले तरीही त्यांना मुख्यमंत्री बनवले. कुठल्याही पक्षाला वाटतं आपला मुख्यमंत्री असावा. देवेंद्र फडणवीस यांना देशाचे व्हिजन आहे. महाराष्ट्र कशारितीने एक नंबरवर आणता येईल याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यात आहेत. त्यांनी ५ वर्ष काम केले आहे. आज फडणवीस-शिंदे जोडी महाराष्ट्राला पुढे घेऊन जातेय असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. ABP ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकमहाराष्ट्राच्या राजकारणात १८ तास काम करणारा अत्यंत चांगला कार्यकर्ता, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील शेवटच्या घटकाला देण्याचा प्रयत्न करतायेत. दोन-अडीच तास झोपतात. मला आश्चर्य वाटते. जनतेतील कार्यकर्ता आणि दुसरीकडे प्रचंड व्हिजन असलेला नेता हे दोघेही एकत्र आले. हे दोन्ही नेते मनाने खूप मोठे आहेत. दोघेही एकमेकांचे निर्णय कधीही थांबवत नाहीत. २०२४ नंतर मी काय सांगू शकणार नाही. मुख्यमंत्री आपला असायला हवा असे प्रत्येक पक्षाला वाटते. हे वाटणे काही गैर नाही असंही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.