Maharashtra Chief Minister News: २८८ पैकी २३० जागा जिंकत महायुतीने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. पण, निकालानंतर खरा गोंधळ बघायला मिळाला. गेल्या दहा दिवसांत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. पण, मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण आणि कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार, याबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? सरकारमध्ये असणार का? या प्रश्नाभोवतीही चर्चेंने फेर धरला आहे. याबद्दल शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी भूमिका मांडली.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर झालेली आहे. ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असून, महायुतीच्या नेत्यांनी मंगळवारी (३ डिसेंबर) पाहणी केली.
यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांना माध्यमांशी सरकार स्थापनेबद्दल प्रश्न विचारले.
संजय शिरसाट म्हणाले, "महायुतीचे नेते चर्चा करत आहेत. ५ तारखेला मोठ्या जल्लोषात शपथविधी सोहळा येथे संपन्न होईल."
शिंदे महायुती सरकारमध्ये असतील का?
महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे असतील का? या प्रश्नाला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, "याबद्दल आज (३ डिसेंबर) सायंकाळी कळेल. रात्री उशिरा बैठक होईल. दुपारी मुख्यमंत्र्यांचीही सह्याद्री अतिथीगृहावर वेगळ्या विषयावर बैठक आहे."
अजून आमची बैठकच झाली नाही -गिरीश महाजन
आझाद मैदानात पाहणीसाठी आलेले गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही, याबद्दल विचारण्यात आले. ते म्हणाले, "अजून आमच्या पक्षाची बैठकच झाली नाहीये. उद्या (४ डिसेंबर) साडेचार वाजता भाजपच्या विधीमंडळ दलाची बैठक आहे. त्यात हे ठरेल. मुख्यमंत्री दुपारी येत आहेत. ६ डिसेंबरच्या संदर्भात त्यांची एक बैठक आहे. त्यानंतर आम्ही सगळे मिळून चर्चा करू", अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.