राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना कुणाची असा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाला ४० आमदार, १२ खासदारांनी ताकद दिली आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आगामी निवडणुकीत मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. यावर मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी माहिती दिली आहे.
“गणेशोत्सवात आपण एकमेकांच्या घरी बाप्पाचं दर्शन घ्यायला जातो अशी परंपरा आहे. यावर्षी पहिल्यांदाच राज ठाकरेंकडे गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे त्या ठिकाणी दर्शनाला आहे. वर्षावर यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण दिलं नव्हतं. यावेळी दिलं आहे. याच्यातून वेगळा काही अर्थ काढू नये. आजच्या घडीला आमच्याकडून कोणता प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला नाही आणि त्यांच्याकडूनही कोणता प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. जर आला तर त्यावेळी योग्य निर्णय राज ठाकरे घेतील,” अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
“वैचारिक दृष्ट्या जवळ असाल तर तो युतीचा एक बेस होऊ शकतो. जर गरज असेल राजकीय पक्षांना तर ते एकत्र येतात, अन्यथा येत नाहीत. गरज असेल तर एकत्र येतील अन्यथा नाही येणार. आज आम्ही सर्वच स्वबळावर लढण्याची तयारी करतोय. भविष्यात काय निर्णय होईल हे सांगता येत नाही. तेव्हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या हिताचा निर्णय राज ठाकरे घेतील,” असंही ते म्हणाले. मी एक कार्यकर्ता आहे. राज ठाकरे जो निर्णय घेतील त्याची रस्त्यावर अंमलबजावणी कशी करायची हे माझं काम आहे. निर्णय घेणं हे त्यांचं काम असल्याचंही ते म्हणाले. पक्षांतर्गत अनेक कामं होत असतात प्रत्येक गोष्टी कॅमेऱ्या समोर सांगायच्या नसतात असंही देशपांडे यांनी स्पष्ट केलं.