शिंदे गटातील आमदारांना पुन्हा पक्षात घेणार?; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 07:43 AM2023-07-27T07:43:34+5:302023-07-27T07:44:59+5:30
२०१४ ते २०१९ यामध्ये सत्ता होती तेव्हा या महाशयांनी भाजपाबरोबर कसं बसायचं? असं म्हणत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.
मुंबई – माझ्याकडे येण्याची त्यांची हिंमत नाही. आले तर वैगेर विषयच नाही. येऊच शकत नाहीत. त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. शिवसेनेची विचारधारा म्हणजेच बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना माहिती आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फुटल्यानंतरही शरद पवारांच्या भेटीला गेले. तसे शिंदेंकडे गेलेले आमदार तुम्हाला भेटण्यासाठी आले तर या संजय राऊतांच्या प्रश्नावर ठाकरेंनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बाळासाहेबांचे विचार सोडले, हे सोडलं, ते सोडलं त्यांचे म्हणणं आहे पण हे सगळे ढोंग आहे. राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो आता राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेलेल्या आहेत. त्यापूर्वी २०१४ ते २०१९ यामध्ये सत्ता होती तेव्हा या महाशयांनी भाजपाबरोबर कसं बसायचं? असं म्हणत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळचे तथाकथित मंत्री होते जे आता गेलेत मी न सांगता बडेजाव मारत होते की, आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो. तुम्हाला राजीनामा घेऊन फिरायला कुणी सांगितले? का वेळ आली होती तुमच्यावर? मला आता सुखाचा वीट आलाय, सगळं मिळालंय आणखी काय देणार म्हणून याच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी मिळवतोय असं बोलून जा ना. हेच सत्य आहे असं त्यांनी म्हटलं.
राहुल गांधींचं कौतुक
बंगळुरूच्या बैठकीत मला खरेच आश्चर्य वाटलं. राहुल गांधींना यापूर्वी मी तसा भेटलेलो नाही. पण आतापर्यंत त्या लोकांनी करून दिलेले जे समज गैरसमज जास्त होते. ते हिंदुद्वेष्टे आहेत, ते असे आहे. ते तसे आहेत. पण प्रत्यक्ष भेटल्यानंतर मला असं वाटलं की राहुल गांधी समजून घेताहेत, ऐकताहेत. त्यांना जे काही वाटतंय ते हळूवारपणे बोलताहेत. नुसतं ऐकून घेत नाहीत तर त्यावर पुढे ती सूचना ते सगळ्यांसमोर मांडतातसुद्धा. अशा पद्धतीनेच जर का हे पुढे सुरू राहिले तर मला वाटतं नाही की पुढे काही अडचण येईल असं कौतुक उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे केले.
भाजपाचा पायंडा देशाला घातक
माझ्याविरोधात अख्खा भाजपा आहे. कोणताही नेता आला तरी उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे बोलत नाही. शिवसेना चोरली आहे. चिन्ह चोरलं. माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील उद्धव ठाकरेंची भीती वाटते. उद्धव ठाकरे ही व्यक्ती नव्हे तर बाळासाहेबांचे विचार आहेत. मोदींच्याविरोधात ही लढाई नाही तर हुकुमशाहीच्या विरोधात आहे. मला भाजपाची चिंता नाही. पण भाजपा पाडत असलेला पायंडा देशाला घातक ठरणारा आहे. तो पायंडा म्हणजे, तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझेच बनणार असं जर चालू राहिलं तर कठीण आहे. उद्या खोके येतील, बंदुका घेऊन येतील आणि कोणीही देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.