अजित पवार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार, राजीनामा देणार अशा चर्चा होत आहेत. यावर शिंदे यांचे मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे. मुख्यमंत्री राजीनामा देणार ही अफवा आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणार हे खोटे आहे. आमच्यावर गेल्या काही काळापासून अत्यंत घाणेरडी टीका होत होती. त्यातूनच आता ही अफवा उठविण्यात आली आहे, असे सामंत म्हणाले.
तिकडे तेरापैकी सहा आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. कालच तीन चार जणांशी बोलणे झाले. फक्त त्यांनी मुंबईत भेटूया नको असे सांगितले आहे. यामुळे दुसऱ्या राज्यात किंवा ठिकाणी आम्ही भेटणार आहोत. विरोधक जो आकडा सांगतायत हो बरोबर आहे, पण ते हे आमदार आहेत, असे सामंत म्हणाले.
मी आता १७५ जागा लढविणार असे सांगितले तर त्याला काही अर्थ नाही. लोकशाही आहे. आमचे ५० आहेत, त्यांच्यासोबत आलेले आहेत त्या जागा ते लढवतील आणि भाजपासोबत असलेल्या त्यांच्या जागा क्लिअर होतील, असे उदय सामंत म्हणाले. एक भाकरी मिळणार होती ती आता अर्धी मिळेल, त्यात वेगळे काय आहे. दोघांमध्ये आता मंत्रिपदे वाटली जाणार असल्याने एक दोन इकडे तिकडे होऊ शकतात, असा खुलासा सामंत यांनी केला आहे.
अजित पवार जर महायुतीत येणार असतील तर आमची ताकद वाढणार आहे. आम्हाला ४५ खासदार निवडून येण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. यामुळे बहुमत असतानाही आम्ही त्यांना सोबत घेतले आहे. बच्चू कडू यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील. काही राहिले असेल तर ते पूर्ण केले जाईल, असे सामंत म्हणाले.