रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 06:04 PM2024-10-15T18:04:46+5:302024-10-15T18:09:11+5:30
Rajiv Kumar on Rashmi Shukla: महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. त्याबद्दल आज केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला.
Rajiv Kumar on Rashmi Shukla, Director General of Police of Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अखेर घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी माध्यमांशी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संवाद साधला. त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शुक्ला यांना हटवण्याबद्दल कुमार यांनी आयोगाच्या वतीने भूमिका मांडली.
निवडणूक आयोग रश्मी शुक्लांना हटवणार का?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. त्यांना हटवण्याबद्दल आयोग काय विचार करत आहे आणि त्यावर काय निर्णय घेतला जाईल?, असा प्रश्न केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना विचारण्यात आला होता.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी काय दिले उत्तर?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "कोणत्याही राज्यात पोलीस महासंचालकाची नियुक्ती प्रक्रियेनुसार होते. सगळ्यात वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव केंद्रीय लोक सेवा आयोगाकडून पाठवले जाते. यूपीएससी या व्यक्तीची निवड करते आणि निवड प्रक्रियेसंदर्भात प्रकाश सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत."
राजीव कुमार पुढे म्हणाले की, "हे संपूर्ण प्रकरण कायदेशीर प्रक्रियानुसार हाताळले जाईल. हे नाव यूपीएससीकडून पाठवण्यात आले आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाने आदेशात काय सांगितले आहे, त्यानुसार हे प्रकरण हाताळले जाईल", असे उत्तर राजीव कुमार यांनी दिले.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात होणार निवडणूक
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. किती टप्प्यात निवडणूक होणार, याबद्दल उत्सुकता होती. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत.